बुलडाणा : शाळेच्या खोलीला आग, जुने रेकॉर्ड जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 11:42 AM2021-01-09T11:42:48+5:302021-01-09T11:44:08+5:30
Fire at Buldhana : आठ जानेवारी राेजी दुपारी अचानक आग लागून त्यात जिल्हा परिषदेचे जुने रेकॉर्ड जळून खाक झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या पाठीमागील बाजूस असलेलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या एका खोलीला आठ जानेवारी राेजी दुपारी अचानक आग लागून त्यात जिल्हा परिषदेचे जुने रेकॉर्ड जळून खाक झाले. नेमके किती नुकसान या आगीत झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही आग नेमक्या कोणत्या कारणाने लागली हेही अद्याप समजलेले नाही. जिल्हा परिषद शाळेच्या या खोलीतील पाच लाकडी अलमाऱ्या, जुने रेकॉर्ड, क्रॉप सायन्सचे साहित्य, सहा शिलाई मशीनचे पायदान जळून खाक झाले. तसेच खोलीच्या छताचेही मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये जुनी लाकडेही जळून खाक झाली. घटनेचे गांभीर्य पाहता अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी राजेंद्र सांगळे, तहसीलदार रूपेश खंडारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यासोबतच आगीचा माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशामक दलास त्वरित पाचारण करण्यात आले. या पथकाने ही आग आटोक्यात आणली दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही आग लागली होती. वेळीच अग्निशामक दल पोहोचल्याने या आगीचा मोठा भडका रोखण्यात यश आले.या जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या खोल्यांमध्ये शिक्षण, आरोग्य विभागाचे सध्या कामकाज चालते. तालुका आरोग्य विभागाचे ही साहित्य या ठिकाणी ठेवण्यात आले होते. आगीची आस ही आरोग्य विभागाच्या कक्षापर्यंतही पोहोचली होती. मात्र आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
सॅनिटायझरचा होता साठा
तालुका आरोग्य विभागाच्या कक्षात काही कर्मचारी तथा सॅनिटायझरचा साठा ठेवण्यात आलेला होता. आगीची आस जर सॅनिटायझरपर्यंत पोहोचली असती, तर मोठा भडका उडाला असता. मात्र वेळीच आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीच्या घटनेत नेमके किती नुकसान झाले हे स्पष्ट होऊ शकले नाही.