बुलडाणा : संचारबंदीचा विसर; वर्दळ सुरूच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 02:26 PM2020-03-28T14:26:39+5:302020-03-28T14:26:45+5:30
प्रशासन गंभीर असले तरी नागरिक बेफिकीर असल्याचे स्पष्ट होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गत दोन दिवस संचारबंदीचे पालन केल्यानंतर आता २७ मार्च रोजी नागरिकांना संचारबंदीचा विसर पडला असल्याचा प्रकार समोर आला. बाजारपेठेसह शहरातील मुख्य रस्त्यांवर गर्दी दिसून आली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन गंभीर असले तरी नागरिक बेफिकीर असल्याचे स्पष्ट होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे संचारबंदी लागू केली. मात्र त्याचे उल्लंघन नागरिकांकडून केले जात आहे. अत्यावश्यक सुविधा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. अनेक नागरिक भाजीपाला, किराणा माल खरेदीचे कारण दाखवून बाहेर पडत आहेत. अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. पोलीस विभाग व नगर पालिकेचे वाहनही शहरातन फिरत आहे. या वाहनाद्वारे शहरात कोरोनाची खबरदारी व उपाययोजनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नका, असे वारंवार सांगितल्या जात आहे. मात्र नागरिकांची गर्दी थांबता थांबत नसल्याचे दिसून येते. छोटे-मोठे कारण सांगून मुले दुचाकीने रस्त्यावरून फिरताना दिसून येत आहेत.
सकाळ संध्याकाळ चहलपहेल; दुपारी सन्नाटा
सकाळ व संध्याकाळी नागरिकांची रस्त्याने चहलपहेल सुरू असते. त्यामुळे संचारबंदी आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होते. दुपारी फक्त रस्त्याने सन्नाटा पाहायला मिळत आहे. अनेक नागरिक रात्रीच्या वेळी रस्त्याने फिरताना दिसून येतात. संचारबंदीतही काही कुटूंब रात्रीच्यावेळी रस्त्याने फिरण्याचे आपले नित्यनियम मोडत नसल्याचे बुलडाण्यात पाहावयास मिळते.
ठरवून दिलेल्या जागेवर उभे रहा!
किराणा दुकान, मेडिकल, भाजीपाला मार्केट याठिकाणी वर्तुळ आखून ग्राहकांना त्याठिकाणी उभे राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. परंतू नागरिक नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येते. येथील बाजारामध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. मेडिकल, दूध डेअरी याठिकाणी सुद्धा आखून दिलेले वर्तुळ नावालाच राहत आहे.