बुलडाणा: चार जिल्ह्यांच्या सीमा पोलिसांनी केल्या सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 12:07 PM2020-03-25T12:07:13+5:302020-03-25T12:07:37+5:30
बुलडाणा जिल्ह्यात येणाऱ्या सर्व आंतरजिल्हास्तरावरील २४ रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोना पॉझीटीव्ह एकही रुग्ण जिल्ह्यात आढळलेला नसून जिल्ह्याच्या सीमा त्यादृष्टीने सुरक्षीत रहाव्या, या दृ्ष्टीकोणातून २३ मार्च रोजी मध्यरात्रीपासून बुलडाणा जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला असून मध्यप्रदेशासह महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांच्या सीमा सिल करण्यात आल्या आहेत.
परिणामी बुलडाणा जिल्ह्यात येणाऱ्या सर्व आंतरजिल्हास्तरावरील २४ रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गापासून जिल्हा सुरक्षीत रहावा, या दृष्टीकोणातून महसूल व वने आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलमांचा आधार घेत २३ मार्चच्या आदेशानुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ३१ मार्च पर्यंत ती राहणार आहे. जिवनावश्यक सेवांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या बाबी वगळता अन्य सेवा १०० टक्के बंद करण्यात आल्या आहेत. सोबत शासकीय व निमशासकीय कार्यालयांचे अवघे पाच टक्के कर्मचाऱ्यांवर काम सुरू आहे. सर्व धार्मिक स्थळेही बंद करण्यात आली आहेत. सोबत नागरिकांनी अवश्यकता नसले तर घराबाहेर पडू नये अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत.
होम क्वारंटीनचे हातावर शिक्के मारलेल्या व्यक्तींनी आगामी १५ दिवस घराबाहेर पडू नये. सोबतच नागरिकांनीही अफवा,अपप्रचाराला नागरिकांनी बळी पडू नये.
या बाबींना बंदी
शहरी, ग्रामीण भागात मुक्त संचार करण्यास मनाई
अत्यावश्यक सेवा वगळता अन्य अन्य सेवा बंद
सार्वजनिक वाहतूक, एसटी बस सेवा, टॅक्सी, आॅटो रिक्षाला बंदी,
आॅटो रिक्षात एकाच व्यक्तीला परवानगी राहणार
खासगी दुचाकी,तीन चाकी, चार चाकी वाहनाद्वारे जिल्ह्यात परिभ्रमणास बंदी
खासगी बससेवाही बंद सर्व धार्मिक स्थळे बंद