बुलडाणा : किराणा दुकान फोडून सव्वा लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 05:52 PM2018-05-16T17:52:55+5:302018-05-16T17:52:55+5:30
बुलडाणा : मलकापूर बसथांबा परिसरातील किराणा दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने सव्वा लाख रुपये लंपास केल्याची घटना १६ मे रोजी पहाटे उघडकीस आली.
बुलडाणा : मलकापूर बसथांबा परिसरातील किराणा दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने सव्वा लाख रुपये लंपास केल्याची घटना १६ मे रोजी पहाटे उघडकीस आली. जुना गावातील तलाठी कार्यालयाशेजारी भंवरलाल सोनराज चोपडा किराणा दुकान आहे. मंगळवारी मालक धनराज चोपडा यांनी नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद केले होते. दरम्यान १६ मे रोजी पहाटे दोन ते चार वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दुकानाचे कुलूप तोडले. आत प्रवेश करुन ड्रॉवरमधील रोख एक लाख २५ हजार रुपये लंपास केले. सकाळी हमाल दुकानावर आल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तत्काळ फोनवरुन त्याने चोरीची माहिती मालकास दिली. मालकाच्या तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात कलम ४६१, ३८० अन्वये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृषी केंद्र फोडण्याचा प्रयत्न
शिक्षणाधिकारी कार्यालयासमोरील धरतीधन कृषी सेवा केंद्र फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना १६ मे रोजी उघडकीस आली. चोरट्याने शटरचे मुख्य कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र बाजूचे दोन कुलूप तसेच राहिल्याने त्याचा चोरीचा प्रयत्न फसला. ही घटना पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली. शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.