बुलडाणा : १८४६ व्यक्तीमागे जिल्ह्यात एक आरोग्य कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 11:09 AM2020-07-31T11:09:17+5:302020-07-31T11:09:36+5:30
सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात १८४६ व्यक्ती मागे एक आरोग्य कर्मचारी असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सद्या धावपळ करत असली तरी जिल्ह्याची एकूण लोकसंख्या विचारात घेता सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात १८४६ व्यक्ती मागे एक आरोग्य कर्मचारी असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात शहरी व ग्रामीण मिळून आरोग्य विभागात २१४२ अधिकारी, डॉक्टर, कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असून त्यापैकी ३१ टक्के अर्थात ६७९ पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात कोरोनाच्या संकटाच्या काळात १४६३ आरोग्य कर्मचाऱ्यांवर जिल्ह्याचा डोलारा सध्या उभा आहे. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्याचे २०१८-१९ चे स्थूल उत्पन्न हे २४ हजार ६६८ कोटींच्या घरात जाते. त्यापैकी प्रत्यक्ष आरोग्य क्षेत्रावर किती खर्च होतो ही बाब प्रशासकीय पातळीवर स्पष्ट झाली नाही. मात्र वार्षिक जिल्हा योजनेच्या २५ टक्के निधी हा आरोग्य विभागावर खर्च केला जात असल्याचे सुत्रांनी सांगितले. जीडीपीशी त्याची तुलना करता हा खर्च अत्यंत नगण्य असल्याचे स्पष्ट होते.
दुसरीकडे जिल्ह्यात १०८ रुग्ण वाहिकांची संख्या २३ व आरोग्य विभागाच्याही जवळपास २२ रुग्ण वाहिका आहे. कोरोना संसर्गाच्या या काळात सध्या रुग्ण वाहिकांची चाकेही सातत्याने फिरत असून वाहन चालक वर्गावरी त्याचा ताण पडला आहे. तालुका निहाय विचार करता सरासरी किमान तीन रुग्ण वाहिका उपलब्ध असल्याचे वास्तव आहे. जुलै अखेर जिल्ह्यात १२०० पेक्षा अधिक कोरोना बाधीत रुग्ण झाले आहे. सरासरी ३४ च्या आसपास सध्या दररोज कोराना बाधीत रुग्ण आढळून येत आहे.
मात्र सध्या प्राप्त परिस्थितीत प्रसंगानुरूप आरोग्य यंत्रणा परिस्थिती हाताळत असून कोरोना संसर्गाच्या निपटाºयासाठीही बुलडाणा जिल्ह्याला मार्च महिन्या दरम्यान जवळपास पावणे दोन कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध झाला होता. त्यानंतर टप्प्या टप्प्याने निधी मिळाला आहे.
कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी निधीचा ओघ
कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी आता आरोग्य विभागाकडे निधीचा ओघ सुरू झाला आहे. एरवी जिल्हा वार्षिक योजनेतून २५ टक्के निधी हा आरोग्य क्षेत्रावर खर्च केल्या जात होता. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडे प्रामुख्याने निधी वळती केला जात आहे. सध्या उपाययोजनांसाठी निधी उपलब्ध असल्याचे डीएचओ कांबळे यांनी सांगितले.
तत्परतेने कार्यवाही
जिल्ह्यात आरोग्य सुविधांसह कोरोना संदर्भाने उपाययोजना करण्यासाठी निधी उपलब्ध आहे. सोबतच कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्यास त्वरित महसूल, आरोग्य, पोलिस व जिल्हा परिषद यंत्रणेसह एकत्रीत येत प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर करण्यासोबतच रुग्णाच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींचे ट्रेसिंग करून कार्यवाही करण्यात येत आहे. गरजेनुरूप सध्या यंत्रणेकडे सुविधा उपलब्ध आहेत.
- डॉ. बाळकृष्ण कांबळे
जिल्हा आरोग्य अधिकारी
सेवा देण्यास प्राधान्य
आरोग्य विभागाकडे उपलब्ध सुविधांच्या आधारे गुणात्मक व दर्जेदार सेवा देण्यास आरोग्य विभागाचे प्राधान्य आहे. कंत्राटीस्तरावरही काही डॉक्टरांची कोरोना संसर्गाच्या संदर्भाने नियुक्ती केली असून प्रसंगानुरूप आरोग्य सेवा देण्यात जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनीही सकारात्मक भूमिका घेतली आहे. सोबतच खासगी रुग्णालयाकडे उपलब्ध असलेले व्हेंटीलेटरही प्रसंगी उपलब्ध करण्यात येणार आहेत. -डॉ. प्रेमचंद पंडीत
जिल्हा शल्यचिकित्सक