बुलडाणा पाटबंधारे विभाग ठरतोय ‘स्वच्छता दूत’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 01:49 AM2017-11-27T01:49:23+5:302017-11-27T01:52:31+5:30
बुलडाणा : जिल्ह्याच्या पाटबंधारे विभागाने सुटीच्या दिवशी स्वच्छतेचा उपक्रम हाती घेण्याचा नवा पायंडा निर्माण केल्याने इतर शासकीय विभागासाठी येथील पाटबंधारे विभाग ‘स्वच्छता दूत’ ठरत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्याच्या पाटबंधारे विभागाने सुटीच्या दिवशी स्वच्छतेचा उपक्रम हाती घेण्याचा नवा पायंडा निर्माण केल्याने इतर शासकीय विभागासाठी येथील पाटबंधारे विभाग ‘स्वच्छता दूत’ ठरत आहे. शनिवार व रविवार या दोन दिवसांच्या सुटीचा सदुपयोग पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी केला असून, स्वच्छतेबरोबरच कार्यालयातील अभिलेख व्यवस्थित लावणे व प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्याचा विशेष उपक्रम राबविला.
स्वच्छता अभियान राबविण्यासाठी शासन स्तरावरून युद्ध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. या अभियानामध्ये शासकीय अधिकारी व कर्मचार्यांचासुद्धा उत्स्फूर्त सहभाग घेतला जातो. स्वच्छता अभियानाविषयी जागृती निर्माण करण्याचे काम शासकीय अधिकारी व कर्मचार्यांकडून केले जाते; मात्र इतरांना स्वच्छतेचा उपदेश देणार्या अधिकारी व कर्मचार्यांचेच कार्यालय नेहमी अस्वच्छ पाहावयास मिळते. अनेक शासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचारी स्वच्छतेकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात; परंतु येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी याला अपवाद ठरले आहेत. लहान, मोठय़ा व मध्यम अशा एकूण १0५ प्रकल्पांचे सिंचन व्यवस्थापनाचे काम पाहणार्या पाटबंधारे विभागातील ३५ अधिकारी व कर्मचार्यांनी सुटीच्या दिवशी स्वच्छतेचा नवा उपक्रम हाती घेतला. अकोला सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता अंकुश देसाई व कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटबंधारे विभाग बुलडाणाच्या उपकार्यकारी अभियंता क्षितिजा गायकवाड व सहायक कर्मचार्यांनी शनिवार व रविवार या दोन दिवसांच्या सुटीचा सदुपयोग म्हणून स्वच्छता अभियान हाती घेतले. तसेच स्वच्छतेबरोबरच कार्यालयातील अभिलेखाचे अद्ययावतीकरण करणे यासारखे विविध उपक्रमही राबविले. बुलडाणा पाटबंधारे विभागाचा हा उपक्रम इतर विभागासाठी आदर्श ठरत आहे.