बुलडाणा : ‘विज्युक्टा’चे जेलभरो आंदोलन; ५0 पदाधिकार्यांना अटक, सुटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 01:07 AM2018-02-03T01:07:37+5:302018-02-03T01:07:57+5:30
बुलडाणा : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या आश्वासित व मान्य मागण्यांची पूर्तता आणि अंमलबजावणीसाठी २ फेब्रुवारी रोजी राज्यभर कनिष्ठ महाविद्यालयांनी महाविद्यालय बंदचे आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या आश्वासित व मान्य मागण्यांची पूर्तता आणि अंमलबजावणीसाठी २ फेब्रुवारी रोजी राज्यभर कनिष्ठ महाविद्यालयांनी महाविद्यालय बंदचे आंदोलन केले. या पृष्ठभूमिवर कनिष्ठ महाविद्यालयाच्या बंदला पाठिंबा म्हणून विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशनच्यावतीने येथील शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आज जेलभरो आंदोलन केले. यावेळी जेलभरो आंदोलनात सहभागी ५0 आंदोलकांना अटक करून सुटका करण्यात आली.
याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, १ नोव्हेंबर २00५ पूर्वी नियुक्त विना व अंशत: अनुदानीत शिक्षकांवरील जुन्या पेन्शनबाबत अन्याय दूर करा, त्यानंतर सेवेत आलेल्यांनासुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करा, कायम विनाअनुदान तत्त्वावरील मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना वेतनात त्वरित अनुदान द्यावे, २३ ऑक्टोबर २0१७ चा वरिष्ठ व निवड श्रेणीचा अन्यायकारक शासनादेश त्वरित रद्द करावा, ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियामधील त्रुटी ताबडतोब दुरूस्त कराव्या, केंद्राप्रमाणे शिक्षकांना ७ वा वेतन आयोग लागू करण्यात यावा व सेवानवृत्ती वय ६0 वर्षे करून सहाव्या वेतन आयोगातील ग्रेड-पेमधील अन्याय दूर करावा, आदी मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयांनी २ फेब्रुवारी रोजी राज्यभर महाविद्यालय बंद आंदोलन केले. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून बुलडाणा येथील शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर विज्युक्टाच्या पदाधिकार्यांनी जेलभरो आंदोलन केले. यावेळी आंदोलनात सहभागी पदाधिकार्यांना अटक करून सुटका करण्यात आली. या आंदोलनात विज्युक्टाचे जिल्हाध्यक्ष प्रा.शिवराम बावस्कर, जिल्हा सचिव प्रा.किशोर काकडे, प्रा.वासुदेव डोंगरे, प्रा.संजय काळे, प्रा. प्रताप सपकाळे, प्रा.सचिन पाटील, प्रा.गणेश भरगडे, प्रा.व्ही.एम.मिरगे, प्रा.आर.एस.देवकर आदी संघटनेच्या पदाधिकार्यांनी सहभाग घेतला होता.