बुलडाणा हरवले अंधारात; एक कोटी ५६ लाख रुपये थकीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 02:48 AM2018-02-21T02:48:40+5:302018-02-21T02:49:17+5:30
बुलडाणा : वीज बिल वाचविण्यासाठी नगरपालिकेने शहरातील विविध चौकात एलईडी स्ट्रीट लाईट लावून झगमगाट केला होता; मात्र १ कोटी ५६ लाख रुपयाचे वीज बिल न भरल्यामुळे २0 फेब्रुवारी रोजी महावितरणने शहरातील स्ट्रीट लाइटसह पाणी पुरवठय़ाची वीज खंडित केली. त्यामुळे बुलडाणा शहरात अंधारात हरवून गेल्याचे दिसत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : वीज बिल वाचविण्यासाठी नगरपालिकेने शहरातील विविध चौकात एलईडी स्ट्रीट लाईट लावून झगमगाट केला होता; मात्र १ कोटी ५६ लाख रुपयाचे वीज बिल न भरल्यामुळे २0 फेब्रुवारी रोजी महावितरणने शहरातील स्ट्रीट लाइटसह पाणी पुरवठय़ाची वीज खंडित केली. त्यामुळे बुलडाणा शहरात अंधारात हरवून गेल्याचे दिसत होते.
थंड हवेचे ठिकाण असलेल्या बुलडाणा शहराला गतवैभव प्राप्त करून विकास करणार असल्याच्या नेत्यांच्या वल्गना आता फोल ठरत आहेत. सत्तेसाठी नगरपालिकेत एकत्र येणारे नेते मंडळी नेहमीच आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी एकमेकांवर कुरघोडी करण्यात आघाडीवर असतात; मात्र त्यांच्या राजकारणाचा फटका आता सर्वसामान्य जनतेला बसत आहेत. बुलडाणा पालिकेने वीज बिल वाचविण्यासाठी नगरपालिकेने शहरातील विविध चौकात एलईडी स्ट्रीट लाइट लावून झगमगाट केला होता; मात्र वीज बिल न भरल्यामुळे २0 फेब्रुवारी रोजी महावितरणचे शहरातील स्ट्रीट लाइटसह पाणी पुरवठय़ाची वीज खंडित केली. स्ट्रीट लाइटचे जवळपास १ कोटी ४0 लाख रुपये थकीत असल्यामुळे शहरातील स्ट्रीट लाइटचे एकूण २६ कनेक्शन कट करण्यात आले आहेत. याशिवाय शहराला पाणी पुरवठा करणार्या येळगाव धरणावरील पाणी पुरवठय़ाचे जवळपास १६ लाख रुपये थकीत असल्यामुळे कनेक्शन कट करण्यात आले आहे. त्यामुळे बुलडाणा शहराचा पाणी पुरवठाही प्रभावित होण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकार्यांनी हस्तक्षेप करावा - सपकाळ
वीज देयकाचा भरणा न केल्यामुळे बुलडाणा शहरातील नागरिकांचा पाणी पुरवठा खंडित होण्यासोबतच पथदिवेही बंद पडले आहेत. त्या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून बुलडाणा पालिकेला अनुषंगिक निर्देश द्यावे, अशी मागणी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. शहराच्या पाणी, पथदिवे, रस्ते यांसह अन्य मूलभूत सविधांबाबत सातत्याने समस्या वाढत आहे. आज बुलडाणेकरांवर आणखी एक संकट ओढवले आहे. वीज देयक थकीत झाल्याने महावितरणकडून पालिकेचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे रात्री आवश्यक असलेले पथदिवे बंद पडले. सोबतच कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करणार्या बुलडाणेकरांना या खंडित वीज पाणी पुरवठय़ाची समस्या उद्भवणार आहे. वास्तविक शहरातील ९0 टक्के नागरिक मालमत्ता कर भरणा करतात. असे असतानाही वीज पुरवठा खंडित होण्याची बाब दुर्दैवी असल्याचे आ. सपकाळ यांनी नमूद केले आहे. प्रकरणी जिल्हाधिकार्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी शहर स्वच्छतेच्या मुद्दय़ावरही आ. सपकाळ यांनी कलम ३0८ अन्वये जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल केलेले आहे.
महावितरणने दिल्या नोटीस
थकीत बिल भरण्यासाठी महावितरणने प्रत्येक महिन्याच्या दोन तारखेला नोटीस देऊन वीज बिल भरण्याची सूचना दिली होती; मात्र या नोटीसची कोणतीही दखल पालिकेने न घेतल्यामुळे शेवटी महावितरणच्या अधिकार्यांनी पालिकेचा शहरातील वीज पुरवठा खंडित केला आहे. याप्रकरणी मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता, त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता.
थकीत वीज बिलामुळे शहरातील स्ट्रीट लाइट व येळगाव धरणावरील पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. याबाबत महावितरणच्या अधिकार्यांशी बोलणे झाले आहे; मात्र मुख्याधिकारी सुटीवर असल्यामुळे बुधवारी चर्चा करून बंद वीज पुरवठा त्वरित सुरू करण्यात येईल.
- नजमुन्नीसा मो.सज्जाद,
नगराध्यक्ष, बुलडाणा.