बुलडाणा: शेगाव येथे विवाहितेची आत्महत्या; नातेवाईक संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 01:11 AM2018-03-09T01:11:08+5:302018-03-09T01:11:08+5:30
शेगाव : शहरातील देशमुखपुरा भागातील विवाहितेने ८ मार्च रोजी घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान, तिने आत्महत्या केली नसून, तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. प्रकरणी जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही विवाहितेचे पार्थिव उचलणार नाही, अशी भूमिका मृत महिलेच्या नातेवाइकांनी घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव येथील वाडी भागातील रहिवाशी सुधाकर बाबाराव पवार (वय ४०, रा. गणपती नगर वाडी, खामगाव ) यांनी याप्रकरणी तक्रार दिली. त्यात त्यांनी नमूद केले आहे की, ८ मार्च रोजी सकाळी पाच वाजतापूर्वी त्यांची बहीण रोहिणी ऊर्फ ललीता संतोष कराळे हिला माहेरावरून एक लाख रुपये प्लॉटसाठी आण, अशी मागणी होत होती. त्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता. त्या त्रासाला कंटाळून तिने गुरुवारी गळफास घेऊन जीवन संपवले. याप्रकरणी तक्रारीवरून आरोपी संतोष जगन्नाथ कराळे, सुमनबाई कराळे, मुकिंदा जगन्नाथ कराळे, मुकिंदाची पत्नी, मुकिंदाचा मुलगा, मुलगी प्राजक्ता, विभा संजय देशमुख, वनमाला अनंता ठाकरे यांच्याविरुद्ध शेगाव पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ११६/०१८ कलम ३०६, ४९८ अ, ३४ भादंवि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास फटील करीत आहेत. यावेळी पोलीस ठाण्याच्या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
नातेवाइकांचा आक्रोश
महिलेच्या मृत्यूप्रकरणी संबंधितावर खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. जोपर्यंत आरोपीवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही पार्थिव उचलणार नाही, असा इशारा नातेवाइकांनी पोलीस प्रशासनाला दिला. रुग्णालयात महिलेचे शवविच्छेदन होत असताना याठिकाणी नातेवाइकांनी गर्दी केली होती. प्लॉट खरेदीसाठी विवाहितेला माहेरहून एक लाख रुपये मागण्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.