बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 11:43 AM2020-09-15T11:43:20+5:302020-09-15T11:43:28+5:30
खा. जाधव यांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोना संसर्गाच्या काळात संसदेचे ऐतिहासिक अधिवेशन १४ सप्टेंबर पासून सुरू झाले असून अधिवेशन सुरू होण्यापूर्वी खासदारांच्या करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे पॉझिटिव्ह आढळून आले आहे.
अधिवेशनापूर्वीच्या चाचणीत एकूण २५ खासदार आतापर्यंत पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यात खा. जाधव यांचाही समावेश आहे.
दरम्यान, खा. जाधव यांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. खुद्द खा. जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना ही बाब स्पष्ट केली. सध्या ते २३ अशोका रोड मार्गावरील आपल्या निवासस्थानी असून त्यांना होम क्वारंटीन राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. दिवसातून चारवेळा त्यांच्या शरीरातील आॅक्सीजन लेव्हल तपासण्यात येत असून तीही ९८ ते ९९ टक्के राहत असल्याचे खा. जाधव म्हणाले. ताप तथा तत्सम लक्षणे आपणास नाही. कुठलाही अशक्तपणाही नाही. त्यामुळे कोणीही काळजी करण्याचे कारण नाही. या संदर्भात सातत्याने येणारे भ्रमणध्वनी पाहता कार्यकर्त्यांसाठी एक व्हीडीओही आपण समाजमाध्यमांवर माहितीस्तव टाकला असल्याचे ते म्हणाले. दहा सप्टेंबर रोजी खा. प्रतापराव जाधव हे दिल्ली येथे पोहोचले होते. त्याच दिवशी त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. प्रारंभी अॅन्टीजेन्ट टेस्ट करण्यात आली होती. ती निगेटीव्ह आली होती. त्यामुळे आरटीपीसीआरची त्यांची दुसरी तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल ११ सप्टेंबर रोजी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना दिल्ली येथील त्यांच्या निवासस्तानीच होम क्वारंटीन केले आहे. मध्यंतरी शिवसेनेचे काही पदाधिकारीही पॉझिटिव्ह आले होते.