बुलडाणा : निवडणूक रिंगणात सहा टक्केच महिला उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 01:56 PM2019-10-07T13:56:15+5:302019-10-07T13:56:35+5:30
जिल्ह्यात सात विधानसभा मतदासंघामध्ये सध्या ७५ उमेदवार रिंगणात असून त्यात महिला उमेदवारांचा समावेश केळव सहा टक्के आहे.
- ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : राष्ट्रमाता जिजाऊंच्या रुपाने बुलडाणा जिल्ह्याची ओळख राज्यभरात मातृतीर्थ नावाने आहे. परंतू मातृतीर्थ जिल्ह्यातीलच चार मतदारसंघात महिला राजकीय आखाड्यापासून दूरच आहेत. जिल्ह्यात सात विधानसभा मतदासंघामध्ये सध्या ७५ उमेदवार रिंगणात असून त्यात महिला उमेदवारांचा समावेश केळव सहा टक्के आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रणांगणात स्त्रीशक्तीची वानवा दिसून येत आहे.
आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसून येतात. मात्र आजही निवडणूकीच्या आखाड्यांमध्ये महिलांची संख्या नगण्यच आहे. मतदार नोंदणी आणि प्रत्यक्ष मतदान या दोन्हीमध्ये महिला मतदार पुरूषांच्या तुलनेत पिछाडीवर असल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून वारंवार समोर आले आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील लोकसभेच्या असोत किंवा विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महिला मतदारांची मतदानाची टक्केवारी पुरूषांच्या तुलनेत कमीच राहिलेली आहे. मतदानपाठोपाठ प्रत्यक्ष निवडणूकीमध्ये उतरण्यातही महिलांचा सहभाग कमीच आहे. अर्ज छाननी प्रक्रियेनंतर जिल्ह्यातीत सात विधानसभा मतदासंघात एकूण ७५ उमेदवार आहेत. त्यामध्ये केवळ पाच महिला उमेदवारांचा समावेश आहे. सध्या मेहकर, मलकापूर, बुलडाणा व खामगाव या मतदासंघातून एकही महिला उमेदवार नाही. मेहकर विधानसभा मतदरसंघातून एकूण नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये अपक्ष म्हणून रेखा बिबे या महिलेचा समावेश होता. परंतू अर्ज छाननीमध्ये या महिला उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने मेहकर विधानसभा मतदारसंघात एकही महिला उमेदवार नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मेहकर विधानसभा मतदारसंघातून १४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी राष्ट्रवादीने अश्विनी आखाडे या महिला उमेदवाराला संधी दिली होती. परंतू त्यांचा शिवेसेनेसमोर टिकाव न लागल्याने राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावरही राहू शकली नाही. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मेहकर विधानसभा मतदारसंघातून सहा उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये सुद्धा एकाही महिला उमेदवाराचा समावेश नव्हता.
तीन मतदारसंघातील महिला उमेदवार
सिंदखेड राजा मतदारसंघात सविता शिवाजी मुंडे (वंचित बहुजन आघाडी), तारामती बद्रीनाथ जायभाये (अपक्ष), जळगांव जामोद मतदारसंघात डॉ. स्वाती संदीप वाकेकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), चिखली मतदारसंघात श्वेता विद्याधर महाले (भाजप) व परवीन सय्यद हारून (बसपा) ह्या पाच महिला उमेदवार सध्या निवडणूक रिंगणात आहेत. परंतू अर्ज मागे घेण्याची अंतीम मुदत ७ आॅक्टोबर असल्याने या दिवशी किती उमेदवार रिंगणात राहतात, त्यात महिला किती माघार घेतात यावरच खरे चित्र स्पष्ट होईल.
इच्छुक महिला उमेदवारांच्या पदरी निराशा
विधानसभा निवडणुकीमध्ये बुलडाण्यासह मेहकर मतदासंघातून भाजप, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडीकडून काही महिला उमेदवार इच्छुक होत्या. परंतू त्यांना पक्षाकडून संधी मिळालीच नाही. त्यामुळे इच्छुक महिलांच्या पदरात निराशाच पडली. बुलडाणा व मेहकर विधानसभा मतदारसंघात प्रमुख पक्षांकडून महिलांना प्रतिनिधीत्व देण्याचा विचारच केला जात नसल्याचे दिसून येत आहे.