‘सीसीटीएनएस’प्रणालीमध्ये बुलडाणा पोलीस १९व्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:42 AM2021-09-16T04:42:29+5:302021-09-16T04:42:29+5:30

बुलडाणा : पोलीस प्रशासनाची गतिमानता वाढावी, तसेच गुन्हेगारीला आळा घालताना राज्य व देशातील पोलीस यंत्रणेत एक समन्वय रहावा या ...

Buldana Police is ranked 19th in the CCTNS system | ‘सीसीटीएनएस’प्रणालीमध्ये बुलडाणा पोलीस १९व्या स्थानी

‘सीसीटीएनएस’प्रणालीमध्ये बुलडाणा पोलीस १९व्या स्थानी

Next

बुलडाणा : पोलीस प्रशासनाची गतिमानता वाढावी, तसेच गुन्हेगारीला आळा घालताना राज्य व देशातील पोलीस यंत्रणेत एक समन्वय रहावा या दृष्टीने कार्यान्वित करण्यात आलेल्या सीसीटीएनएसप्रणालीमध्ये बुलडाणा जिल्हा सध्या १९व्या क्रमांकावर आहे. सीसीटीएनसप्रणालीमुळे गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होत आहे. बुलडाणा पोलिसांना हायस्पीड नेटवर्क मिळाल्यास ही प्रणाली जिल्ह्यात आणखी गतिमान होण्यास मदत होणार आहे.

क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टिम (सीसीटीएनस) अर्थात गुन्हे आणि गुन्हेगार तपास जाळे प्रणालीच्या राज्यस्तरीय कामकाजात बुलडाणा जिल्हा पोलीस दलाने राज्यात १९वा क्रमांक मिळविला आहे. जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या आढाव्यामध्ये दैनंदिन प्रभावी वापर, अचूकता आणि नागरिकांच्या ई-तक्रारींची पूर्तता यामुळे १३२ गुण जिल्हा पोलीस दलाला मिळाले आहेत. असे जरी असले तरी १३ तालुक्यांचा जिल्हा असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात अनेक भागांत अद्यापही अत्याधुनिक यंत्रणा न पोहोचल्यामुळे सीसीटीएनएस प्रणालीमध्ये अडचणी येत असल्याची माहिती आहे. तरीही नागरिकांना कोणताही त्रास न होता सर्व पोलीस ठाण्याचे कामकाज आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करत ऑनलाइन कामावर भर दिला जात आहे. पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या होत्या.

वऱ्हाडात अकोला अग्रस्थानी

वऱ्हाडातील बुलडाणा, वाशीम आणि अकोला या जिल्ह्यापैकी अकोला पोलिसांची कामगिरी बघता अकोला १७१ गुणांसह ७१ टक्के घेऊन १४व्या स्थानी आहे, तर त्यानंतर बुलडाणा १९व्या स्थानी आणि वाशीम ५१ टक्के घेऊन ३०व्या स्थानी राज्यातून आलेला आहे.

अनेक पोलीस स्टेशनपर्यंत नेटवर्कच पोहोचले नाही

बुलडाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्याचा सीसीटीएनएसप्रणाली वापरामध्ये १९वे स्थान मिळाले जरी असले तरी हे स्थान मिळविण्यासाठी बुलडाणा पोलिसांना अथक परिश्रम घ्यावे लागले आहे. कारण, जिल्हा पोलिसांना मिळणारा नेट डाटा हा अद्याप हायस्पीड नसून, अनेक पोलीस स्टेशनमध्ये ही प्रणाली वापरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

सीसीटीएनएस प्रणालीचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना सर्व ठाणेप्रमुखांना दिल्या होत्या. तरीही पोलीस स्टेशनला मिळणाऱ्या नेटवर्कची अडचण दूर झाल्यास बुलडाणा पोलीस राज्याच्या क्रमवारीत पुढे नक्कीच जाईल.

-बजरंग बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक, बुलडाणा

Web Title: Buldana Police is ranked 19th in the CCTNS system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.