बुलडाणा: वृक्षारोपणासाठी ९५ लाखावर खड्डे सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 02:36 PM2019-07-01T14:36:01+5:302019-07-01T14:36:27+5:30
जिल्ह्याला ८४.७१ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मिळाले असून, या उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: शासनाच्या ३३ कोटी वृक्षारोपणाच्या उपक्रमास १ जुलैपासून सुरुवात होत आहे. जिल्ह्याला ८४.७१ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मिळाले असून, या उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. वृक्षारोपणासाठी जिल्ह्यात ९५.४६ लाख खड्डे करण्यात आले आहेत.
वृक्ष लागवड मोहीम १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान वन महोत्सव साजरा होणार आहे. हरित चळवळ बनलेल्या या मोहिमेत सर्वांनी हिरिरीने सहभाग घ्यावा, सामाजिक वनीकरण व वन विभाग यांच्याकडून रोपे मिळवून घ्यावीत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्याला ८४.७१ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मिळाले असून, या उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. वृक्ष लागवडीसाठी उद्दिष्टापेक्षा जास्त ९५ लाख ४६ हजार खड्डे खोदण्यात आले आहे. वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टामध्ये वन विभाग २६ लाख ७४ हजार, सामाजिक वनीकरण १८ लाख २० हजार, ग्रामपंचायत १६.६६ लाख व इतर प्रशासकीय यंत्रणा ३३.८६ लक्ष उद्दिष्टाचा समावेश आहे. सन २०१९-२० मध्ये शासन निर्णयानुसार सवलतीच्या दरात ३० सप्टेंबर पर्यंत वन व सामाजिक वनीकरण विभागामार्फत रोपे पुरविण्यात येणार आहे.
वन महोत्सवासाठी रोपवाटिका सज्ज
- १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१९ दरम्यान महाराष्ट्रात वन महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
- ३३ कोटी वृक्ष लागवडीसाठी आपला महत्त्वपूर्ण सहभाग घेण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या बुलडाणा तालुक्यातील येळगाव येथील रोपवाटिकेत ८० हजार उंच रोपे व १ लाख ५० हजार लहान रोपांची निर्मिती करण्यात आली आहे.
- ही रोपे लागवडीसाठी तयार असून, बुलडाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी ती लावून पर्यावरण संवर्धनात त्यांचा मोठा सहभाग असेल.
- लावलेल्या झाडांच्या संवर्धन व संरक्षणासाठी सर्वांचा पुढाकार आवश्यक आहे.
पर्यावरण समतोल राखणारी हरित चळवळ
४वृक्षारोपणाची ही हरित चळवळ आहे. ज्यामध्ये पर्यावरण समतोल राखणाऱ्या या चळवळीमध्ये समाजातील प्रत्येक घटकाचा समावेश महत्त्वाचा आहे. जिल्ह्यातील सामाजिक संस्था, खासगी व्यापारी संस्था, बँका व खासगी कंपन्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन वृक्षारोपण करावे. घराच्या परिसरात, खुली जागा असेल तिथे, कार्यालय, शाळा, महाविद्यालये परिसर, खासगी कंपनी परिसर व वैयक्तिक स्तरावर वृक्षारोपण करावे, असे आवाहन उपवनसंरक्षक यांनी केले आहे.