बुलडाणा : आधार दुरूस्तीला १५ अर्जांच्या मर्यादेमुळे अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 02:20 PM2018-02-09T14:20:07+5:302018-02-09T14:22:50+5:30
बुलडाणा : आधार कार्डमध्ये झालेल्या चुकांच्या दुरुस्तीसाठी नागरिकांना या केंद्रांचा ‘आधार’ असला तरी प्रती दिन फक्त १५ जणांना अर्ज देऊन या दुरुस्तीला प्राधान्य देण्यात येत आहे.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा : आधार कार्ड दुरुस्तीसह आधार संबंधीत विविध कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत जिल्ह्यात केवळ १०५ ठिकाणी आधार कीट देण्यात आल्या आहेत. आधार कार्डमध्ये झालेल्या चुकांच्या दुरुस्तीसाठी नागरिकांना या केंद्रांचा ‘आधार’ असला तरी प्रती दिन फक्त १५ जणांना अर्ज देऊन या दुरुस्तीला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करीत आपला नंबर येण्याची वाट पहावी लागत आहे.
बँकेसह विविध कामांसाठी आधार कार्ड आवश्यक झाले आहे. परंतू अनेकांच्या आधार कार्डमध्ये नावात बदल, जन्मतारखेत बदल, मोबाईल क्रमांक, पत्ता, ई-मेल आयडी आदी बाबींची दुरूस्ती करणे गरजेचे आहे. सुरूवातील सेतू केंद्र, महा-ई सेवा केंद्रांसह टपाल कार्यालय, बँका, बीएसएनएल कार्यालयांमध्ये आधार नोंदणी केंद्रे सुरू होती. परंतू सध्या बहुतांश आधार नोंदणी केंद्र बंद करण्यात आले असून काही ठिकाणी आधार केंद्र शोधुनही सापडत नसल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यात केवळ १०५ ठिकाणीच आधार कीट देण्यात आलेल्या आहेत.
त्यामध्ये बुलडाणा तालुक्यात सात, चिखली १२, देऊळगाव राजा सात, जळगाव जामोद पाच, खामगाव १२, लोणार सात, मलकापूर आठ, मेहकर १२, मोताळा १०, नांदूरा आठ, संग्रामपूर चार, शेगाव पाच आणि सिंदखेड राजा आठ ठिकाणी आधार कीट आहेत. सध्या आधार दुरूस्ती, बायोमेट्रीक नोंदी, मोबाईल क्रमांक टाकणे यासारखे कामे वाढलेले असताना जिल्ह्यात आधार किटची कमतरता जाणवत आहे.
वाढत्या गर्दीमुळे काही आधार कीट चालकांनी टोकन पद्धत सुरू केली आहे. सकाळी १५ जणांना अर्ज देवून त्या १५ जणांचीच कामे दिवसभरात केली जात आहेत. तसेच आधार डाटा पाठविण्याचे सांगूण सायंकाळी ४ वाजेनंतर आधार नोंदणी किंवा दुरूस्तीचे काम करण्यास नकार दिला जातो. त्याचबरोबर सर्व्हरबाबत तांत्रिक अडचणीमुळे होणारा विलंब, हाताचे ठसे व डोळ्याचे स्कॅनिंग होत नसल्यामुळे अडचणी येत आहे. आधारची संगणकीकृत माहिती (डेटा) साठवून ठेवण्यासाठी असलेल्या मुख्य सर्व्हर बंद पडत असल्यामुळे आधार नोंदणीच्या अधिकृत केंद्रावर गर्दी वाढत आहे. प्रकरणी ही मर्यादा वाढून देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. त्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी ओरड आहे.
आधार दुरूस्तीसाठी केंद्रावर चकरा
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आधार केंद्र चालकांना आधार केंद्रावर १५ अर्जाची कुठलीही मर्यादा देण्यात आलेली नाही; तसेच ४ वाजेपर्यंतच आधारची कामे करावी, असे वेळेचे बंधन सुद्धा घालण्यात आलेले नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र तरीसुद्धा आधार केंद्र चालकांकडून केवळ १५ अर्ज व ४ वाजेपर्यंतच काम होईल अशा वेगवेगळ्या अटी ठेवण्यात येत असल्याने आधार दुरूस्तीसाठी नागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागत आहेत.
बुलडाण्यात केवळ एक कीट
आधार नोंदणी किंवा दुरूस्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत जिल्ह्यात १०५ कीट देण्यात आल्या आहेत. त्यातील बहुतांश कीट बंद अवस्थेत आहेत. बुलडाणा तालुक्यात चांडोळ, बुलडाणा, धामणगाव, म्हसला बु., तराळखेड, शिरपूर, भडगाव या सात ठिकाणी आधार कीट देण्यात आल्या आहेत. परंतू लोकसंख्येच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या बुलडाणा शहरात आधारसाठी केवळ एक कीट जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत देण्यात आली असून, या एका केंद्रावर अनेक अडचणी येत आहेत.