गरज ३ कोटींची, मिळाले ३३ लाख!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 09:32 PM2017-08-21T21:32:04+5:302017-08-21T21:42:53+5:30
ब्रह्मानंद जाधव।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडे ३ कोटी रुपयांची मागणी केली होती; मात्र त्यासाठी केवळ ३३ लाख रुपये शिष्यवृत्ती आल्याने ११ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत. शिष्यवृत्ती रखडल्याने नवीन शिष्यवृत्तीचे अर्ज करावे की नाही, असा प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.
अस्वच्छ व्यवसायात काम करणाºया पालकांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी व त्यांना समाज प्रवाहात आणण्यासाठी अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आलेली आहे. अस्वच्छ व्यवसायात काम करणारे, अस्वच्छ व्यवसायाशी परंपरेने संबंधित सफाईगार, कातडी सोलने, कातडी कमावणे व कागदाचा कचरा गोळा करणे या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींच्या पाल्यांना अनुज्ञेय आहे; परंतु जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्तीचे भिजत घोंगडे आहे.
सन २०१५-१६ मध्ये अस्वच्छ व्यवसाय योजनेंतर्गतची शिष्यवृत्ती देण्यात आली नाही. त्यानंतर सन २०१६-१७ मध्ये या योजनेंतर्गत ३ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती; परंतु त्यासाठी केवळ ३३ लाख रुपये समाजकल्याण विभागाला प्राप्त झाले. या प्राप्त निधीतून सन २०१५-१६ मध्ये अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्तीच्या लाभार्थ्यांना याचा लाभ देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात ११ हजार लाभार्थी अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाकडूनच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नसल्याने शिष्यवृत्तीच्या योजना कुचकामी ठरत आहेत. त्यामुळे सध्या शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, या अर्जाची मुदत ३१ आॅगस्ट आहे.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचे ७ हजार विद्यार्थी वंचित
मुलींचे प्राथमिक शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजना निर्माण करण्यात आलेली आहे; परंतु या योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थी विद्यार्थ्यांना वारंवार शिष्यवृत्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्ह्यातील ७ हजार विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीची प्रतीक्षा आहे.
राज्यातील २८ लाख ९७ हजार विद्यार्थी वंचित
राज्यात अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना सुरू आहेत; परंतु अनेक विद्यार्थ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दहावीपूर्व शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे; परंतु त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांना गेल्या काही वर्षांपासून शिष्यवृत्तीची रक्कम मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. केंद्र शासनाकडून अनुदान प्राप्त होऊनही राज्यात जवळपास २८ लाख ९७ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत.
अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्तीचे केवळ ३३ लाख रुपये प्राप्त झाल्याने त्याचा नियमानुसार लाभ देण्यात आला. तसेच सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती व मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीची बिले काढलेली आहेत. लवकरच ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल.
- मनोज मेरत
जिल्हा समाज कल्याण अधिकारी, बुलडाणा