बुलडाणा: सकाळी अविरोध निवड झालेल्या शिक्षण सभापतींचा संध्याकाळी राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 05:14 PM2021-01-21T17:14:42+5:302021-01-21T17:15:04+5:30
Buldhana Municipal Counsil News अविरोध निवड झाल्यानंतर नवनियुक्त सभापतींनी सायंकाळी लागलीच आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकाºयांकडे सुपूर्द केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: स्थानिक पालिकेच्या शिक्षण सभापतीपदी अविरोध निवड झाल्यानंतर नवनियुक्त सभापतींनी सायंकाळी लागलीच आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकाºयांकडे सुपूर्द केला. त्यामुळे बुलडाणा नगर पालिकेत एकच खळबळ उडाली असून नाराज सभापतींच्या मनधरणीचे प्रयत्न महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांकडून सुरू असल्याचे समजते.
बुलडाणा नगरपालिकेसह जिल्ह्यातील ९ नगर पालिकांमध्ये गुरूवारी विषय समिती सभापतींपदासाठी निवडणूक पार पडली. बुलडाणा नगर पालिकेत सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपसी समजोता करीत, विषय समिती निवडणूक अविरोध पार पाडली. यावेळी शिक्षण सभापतीपदी अविरोध विजयी झालेल्या गौसीया बी सत्तार कुरेशी (राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी आपल्यापदाचा राजीनामा जिल्हाधिकाºयांकडे सुपूर्द केला. त्यामुळे बुलडाणा पालिकेत एकच खळबळ उडाली. सत्तेच्या वाटाघाटीत नाराज झाल्यानेच शिक्षण सभापती गौसीया बी यांनी राजीनामा दिल्याचे समजताच, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न चालविल्याचे समजते.
अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
सकाळी शिक्षण सभापतीपदी निवड झाल्यानंतर गौसीया बी सत्तार कुरेशी यांनी सायंकाळी जिल्हाधिकाºयांकडे राजीनामा दिला. शिक्षण सभापतींच्या ना- राजीनामा नाट्यामुळे बुलडाणा पालिकेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात आहे.