बुलडाणा : सात मतदान केंद्रांची जबाबदारी महिलांच्या खांद्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 03:39 PM2019-10-20T15:39:17+5:302019-10-20T15:39:27+5:30
निवडणुकीत सखी, अर्थात महिलांचे, महिलांसाठी आणि महिलांनी चालवलेले मतदान केंद्र ही संकल्पना चांगलीच रूजली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. महिला मतदारांचा मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त सहभाग वाढावा, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात एका सखी मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व मतदान केंद्रांची जबाबदारी महिलांच्या खांद्यावर असणार आहे.
निवडणुकीत सखी, अर्थात महिलांचे, महिलांसाठी आणि महिलांनी चालवलेले मतदान केंद्र ही संकल्पना चांगलीच रूजली आहे. जिल्ह्यातील मलकापूर मतदारसंघात वाकोडी, बुलडाणा श्री शिवाजी विद्यालय, चिखली नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा, सिंदखेडराजा नगर परिषद उर्दू हायस्कूल, मेहकर मतदारसंघातील विवेकानंद नगर, खामगाव एमजेपी तर जळगाव जामोद मतदारसंघात शिवाजी विद्यालयात सखी मतदान केंद्र कार्यरत राहणार आहे. या केंद्राचे मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक केंद्राध्यक्ष, सहाय्यक म्हणून महिला काम पाहणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका केंद्राची जबाबदारी चार अधिकारी आणि एक कर्मचारी असे एकुण पाच जण सांभाळतील. जिल्ह्यातील सात मतदारसंघांमध्ये कार्यरत सखी मतदान केंद्रावर २८ महिला अधिकारी तर ७ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.
सर्व सखी मतदान केंद्रांवर गुलाबी रंगाने सजावट करण्यात येणार आहे. सजावटीमध्ये रांगोळी, पोस्टर्स इत्यादींचा समावेश राहणार आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पोलींग पार्टीमध्ये ९ हजार ९५६ पुरूष व ६५३ महिला मनुष्यबळ असणार आहे. जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातील मतदार केंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
सिंदखेड राजात सर्वाधिक महिला
जिल्ह्यात एकुण २० लाख ३९ हजार ४३५ मतदार आहेत. यापैकी १० लाख ६८ हजार ४०७ पुरुष तर ९ लाख ७१ हजार १९ महिला मतदार आहेत.
सर्वाधिक सिंदखेडराजा तर सर्वात कमी महिला मतदारांची संख्या मलकापूर मतदारसंघात आहे. सिंदखेडराजा १ लाख ४६ हजार तर मलकापूर मतदारसंघात १ लाख २६ हजार ७०३ महिला मतदार आहेत.