बुलडाणा : प्रतिबंधीत क्षेत्रांचा घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 10:44 AM2020-06-01T10:44:40+5:302020-06-01T10:45:01+5:30
२२ कंटेन्मेंट झोनचा आता २८ दिवसानंतर आढावा घेऊन त्यामध्ये शिथीलता देण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय समिती निर्णय घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : पाचवा लॉकडाउन हा अनलॉकच्या दिशने टाकण्यात आलेले पाऊल असल्याचे चित्र सध्या एकंदरीत परिस्थितीवरून समोर येत असून बुलडाणा जिल्ह्यात सध्या असलेल्या २२ कंटेन्मेंट झोनचा आता २८ दिवसानंतर आढावा घेऊन त्यामध्ये शिथीलता देण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय समिती निर्णय घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, सोमवारी पाचव्या लॉकडाउनच्या संदर्भाने जिल्हाधिकारी पुन्हा आढावा घेवून नवीन मार्गदर्शक सुचना काढणार असल्याचे संकेत सुत्रांनी दिली.
दरम्यान, दोन दिवसापूर्वीच जिल्हास्तरीय समितीने जिल्हतील ३० प्रतिबंधीत क्षेत्रांचा आढावा घेवून ३० मे रोजीच ज्या प्रतिबंधीत क्षेत्रात गेल्या २८ दिवसात एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळून आला नाही तथा वैद्यकीय संकेतानुसार संबंधित भाग किती सुरक्षीत आहे याची खातरजमा केल्यानंतर आठ प्रतिबंधीत क्षेत्रात शिथीलता दिली आहे.
प्रामुख्याने या समितीमध्ये जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस., जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील एकंदर स्थिती तथा कोरोना संसर्गाचा धोका, समूह संक्रमणाची जिल्ह्यात स्थिती आहे किंवा नाही, याचा सविस्तर आढावा घेवून सध्या कार्यरत असलेल्या २२ प्रतिबंधीत क्षेत्रांचा २८ दिवसानंतर आढावा घेवून त्या ठिकाणी शिथीलता द्यावयाची आहे किंवा नाही, याचा निर्णय ही समिती घेणार आहे.
बुलडाणा जिल्हा सध्या नॉन रेड झोनमध्ये आहे. प्रतिबंधीत क्षेत्रात समुह संक्रमणाचा धोका नसल्यास संबंधित भाग हा नॉन रेडझोनमध्ये जात असतो. सध्या बुलडाणा नॉन रेडझोनमध्ये आहे.
जिल्हाधिकारी आज आढावा घेऊन मार्गदर्शक सुचना काढणार
पाचव्या लॉकडाउनच्या संदर्भाने जिल्हाधिकारी सोमवारी नव्या मार्गदर्शक सुचना काढणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील एकंदर परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी नव्या मार्गदर्शक सुचना काढणार असल्याचे सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मात्र वर्तमान स्थितीत जिल्ह्यात जी शिथीलता देण्यात आलेली आहे ती तशीच कायम राहणार असल्याचे संकेतही देण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात काही फारमोठी सुट मिळले, असे चित्र तुर्तास तरी दुरापास्त आहे.