बुलडाणा : ‘लॉकडाउन’मध्ये शिथीलता मिळताच गजबजले रस्ते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 10:36 AM2020-05-10T10:36:09+5:302020-05-10T10:36:24+5:30
दुपारी १२ वाजेपर्यंत राहणारी गर्दी सायंकाळी सात वाजेपर्यंत राहत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनाच्या पृष्टभूमीवर आतापर्यंत लॉकडाउनच्या नियमांची कडक अंमलबजावणी होत होती. परंतू आता जिल्ह्यात लॉकडाउनमध्ये शिथीलता मिळताच रस्ते गजबल्याचे दिसून येत आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत राहणारी गर्दी सायंकाळी सात वाजेपर्यंत राहत आहे. प्रशासनाने दिलेल्या मोकळीकमुळे पोलिसांवरील ताण वाढत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे २४ मार्चपासून लॉकडाउन लागू करण्यात आले होते. तेव्हापासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सुरक्षेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आली होती. सध्या ‘लॉकडाउन’ सुरू असले तरी, काही प्रमाणात नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे शुक्रवारपासून बरीच दुकाने सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त दुकाने उघडल्याने नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करीत आहेत.
आतापर्यंत मेडीकल, दवाखाने व अन्य अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता इतर दुकाने बंद होती. मात्र, यामुळे अर्थव्यवस्थेवर खूप मोठे विपरीत परिणाम होण्यास सुरूवात झाली होती. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना ‘लॉकडाउन’चा चांगलाच फटका बसला. त्यामुळे काही निर्बंध कायम ठेवत ‘लॉकडाउन’चे नियम थोडेफार शिथील करण्यात आले. त्यानुसार ८ मे पासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर वस्तुंची दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. बुलडाणा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात ही दुकाने सुरू करण्यात आली. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी वाढली आहे. कोरोचे रुग्ण इतर जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहेत. दुसरीकडे लॉकडाउनमध्ये शिथीलता मिळाल्याने अनेक नियमांचे उल्लंघनही होताना दिसून येत आहे.