बुलडाणा : परजिल्ह्यातून रेतीची चोरटी वाहतूक; तहसीलची पथके रात्र गस्तीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 01:22 AM2017-12-27T01:22:05+5:302017-12-27T01:22:16+5:30
बुलडाणा: एकही रेतीघाट नसलेल्या बुलडाणा तालुक्यात लगतच्या जालना जिल्हय़ातून मोठय़ा प्रमाणावर रेतीची चोरटी वाहतूक होत असून, त्याची कुणकुण लागताच महसूल विभागाने तहसीलदार सुरेश बगळे यांच्या नेतृत्वात सीमावर्ती भागात दोन गस्ती पथके गेल्या आठ दिवसांपासून तैनात केली असून, आतापर्यंत जवळपास १७ लाख रुपयांचे अवैध गौण खनिज जप्त केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: एकही रेतीघाट नसलेल्या बुलडाणा तालुक्यात लगतच्या जालना जिल्हय़ातून मोठय़ा प्रमाणावर रेतीची चोरटी वाहतूक होत असून, त्याची कुणकुण लागताच महसूल विभागाने तहसीलदार सुरेश बगळे यांच्या नेतृत्वात सीमावर्ती भागात दोन गस्ती पथके गेल्या आठ दिवसांपासून तैनात केली असून, आतापर्यंत जवळपास १७ लाख रुपयांचे अवैध गौण खनिज जप्त केले आहे. मंगळवारीही पथकाने एक धडक कारवाई करीत एक टिप्पर ताब्यात घेतले होते. बुलडाणा-जांब, तांदुळवाडीसह तालुक्याच्या सीमावर्ती भागात सात मंडळ अधिकारी आणि तलाठी शासकीय वाहनांचा वापर न करता पाळत ठेवत असून, ही कारवाई करत आहे.
बुलडाणा जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मराठवाड्याच्या लगत आहे. मराठवाड्यातील गौताळा अभयारण्यातून उगम पावणार्या खडकपूर्णा नदीमधील रेती ही बांधकामासाठी उत्तम मानल्या जाते. त्यामुळे बुलडाणा, चिखली तालुक्यालगतच्या भागातून बुलडाणा जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणावर रेतीची चोरटी वाहतूक होते. मध्यरात्री दीड ते पहाटे साडेचार-पाच वाजेपर्यंत प्रामुख्याने मोठे टिप्पर ही चोरटी वाहतूक करीत असतात.
मुळात बुलडाणा तालुक्यात एकही रेतीघाट नसल्याने बुलडाणा शहरासह लगतच्या पट्टय़ात खडपूर्णाच्या रेतीवरच अनेकांची भिस्त असते. त्यामुळे या रेतीला मागणी आहे. प्रामुख्याने सीमावर्ती भागातून ही रेती बुलडाणा जिल्हय़ात दाखल होते. जाफ्राबाद तालुक्यात ही रेती बुलडाणा तालुक्यात दाखल होते. यातील काहींकडे रायल्टीसंदर्भातील कागदपत्रे असली तरी काहींजवळ ती नसल्याने महसूल विभागाने ही या प्रकरणी धडक कारवाईचा बडगा उचलला आहे.
चोरट्या वाहतुकीची ४४ प्रकरणे उघड
लगतच्या जालना जिल्हय़ातून बुलडाणा जिल्हय़ात रेतीची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी बुलडाणा तहसीलने ४४ प्रकरणांमध्ये कारवाई करून जवळपास १७ लाख रुपयांचा दंड गेल्या तीन महिन्यात वसूल केला आहे. सोबतच सहा प्रकरणांमध्ये मुरुमाची विनापरवानगी उत्खनन आणि वाहतूक केल्याप्रकरणीही दंड ठोठावला गेला आहे. तीन महिन्यात जवळपास ५१ प्रकरणे तहसीलदार सुरेश बगळे यांनी धडक कारवाई करून उघड केली आहे.
महसूल यंत्रणा रात्र गस्तीवर
बुलडाणा तहसील अंतर्गत असलेली महसूल यंत्रणा सध्या रेतीची अवैध वाहतूक व उत्खनन करणार्याविरोधात धडक कारवाई करत आहे. त्यानुषंगाने तहसीलदार सुरेश बगळे आणि नायब तहसीलदार माळी यांची दोन पथके कार्यरत असून, तांदुळवाडी, जांब, सातगाव म्हसला तथा सैलानीलगच्या पट्टय़ात खासगी वाहनाद्वारे महसूलचे हे कर्मचारी पाळत ठेवत आहे. त्यातंर्गतच २६ डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या एका कारवाईत एक टिप्परही जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.