बुलडाणा: सिंदखेडराजा येथून सावित्री ज्योतीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 01:49 AM2018-03-09T01:49:36+5:302018-03-09T01:49:36+5:30
सिंदखेडराजा: मातृतीर्थ सिंदखेड राजा येथून राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना अभिवादन करून ८ मार्च रोजी सावित्री ज्योतीला प्रारंभ करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ही ज्योत जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा: मातृतीर्थ सिंदखेड राजा येथून राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना अभिवादन करून ८ मार्च रोजी सावित्री ज्योतीला प्रारंभ करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ही ज्योत जाणार आहे.
राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या जन्मगावी जिजाऊ सृष्टी निर्माणाचे कार्य शासनाने हाती घेतले. त्याच धर्तीवर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे सावित्री सृष्टी निर्माण व्हावी, या हेतूने दीपक ठाकरे, संतोष खांडेभराड, संजय मेहेत्रे यांनी गेल्या चार वर्षांपासून सावित्री ज्योत सुरू केली. ८ मार्च रोजी राजवाड्यामधून ज्योत निघाली असून, त्याचा समारोप १० मार्च रोजी नायगाव येथे होणार आहे.
जागतिक महिला दिनाच्या दिवशी ८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता नायगाव येथून आलेल्या सावित्रीबाई महिलांच्या ढोल पथकांच्या गजरात जिजाऊ मासाहेबांना अभिवादन करून स्मृती ज्योतीचे उद्घाटन करण्यात आले.
त्यानंतर भास्करराव आंबेकर, कल्याण आखाडे, सचिन गुलदड, अॅड. नाझेर काझी, तोताराम कायंदे, श्याम जाधव, संतोष खांडेभराड, डॉ. राजेंद्र शिंगणे, आशा झोरे, वसंत मगर, ऋषिकेश जाधव, दीपक बोरकर, पवन झोरे, सत्यजित खरात, विमल माळोदे, मंदा ठाकरे, धृपदराव सावळे, विश्वनाथ माळी, डॉ. सुनील कायंदे सह आजी-माजी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व शहरातील सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला नागरिकांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले. त्यानंतर शहरामधून वाजतगाजत शोभायात्रा काढण्यात आली व स्मृतिज्योत देऊळगावराजा मार्गे जालना, औरंगाबादकडे रवाना झाली.