बुलडाणा : बाप-लेकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 02:43 AM2018-02-27T02:43:55+5:302018-02-27T02:43:55+5:30
बाप-लेकाने साखरखेर्डा येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : शिंदी येथील बाप-लेकाने साखरखेर्डा येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. यापूर्वी याच घरातील एका मुलीने आणि मुलाने आत्महत्या केली होती. एकाच वर्षात कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याने अनेक शंका-कुशंका उपस्थित करण्यात येत आहेत.
शिंदी येथील संतोष नारायण बंगाळे (६५) यांना लक्ष्मण (४०) हा मुलगा व चार विवाहित मुली आहेत. लक्ष्मण याला एक मुलगी आणि एक मुलगा होता. लक्ष्मण पत्नी मुलांचा छळ करीत होता. श्रावण महिन्यात लक्ष्मण दिंडीला गेला असताना चैतन्यने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वाच्यता नको म्हणून रात्रीच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच मुलगी सोनाली हिने वडिलांसोबत भांडण झाल्याने दोन महिन्यांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. हे प्रकरण गावातच मिटविण्यात आले. लक्ष्मण याच्या विक्षिप्त स्वभावामुळे संतोष मुलापासून वेगळे राहत होते. लक्ष्मणच्या त्रासाबाबत पत्नीने साखरखेर्डा पोलीस ठाण्यात तोंडी तक्रारही दिली होती. दोन दिवसांपूर्वी पुन्हा पती-पत्नीत भांडण झाले. पत्नी रागाच्या भरात माहेरी निघून गेली, तर लक्ष्मण सोमवारी लग्नानिमित्त शिंदीला गेला. परत साखरखेर्ड्याला येताना वडील संतोष यांना सोबत घेऊन आला. त्यानंतर मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास दोघेही दोरांनी गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसले.