बुलडाणा:शौचालय बांधकाम कागदावरच!चौकशीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 01:26 AM2018-04-11T01:26:41+5:302018-04-11T01:26:41+5:30
खामगाव: स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील शौचालय उभारणीत लाभार्थ्यांची फसवणूक आणि कंत्राटदाराने अनुदान लाटल्याची वस्तुस्थिती काही दिवसांपूर्वीच जळगाव जामोद तालुक्यात समोर आली. तसाच काहीसा प्रकार आता खामगाव तालुक्यात उजेडात आला असून, संग्रामपूर तालुक्यात शौचालय बांधकामातील भ्रष्टाचाराविरोधात उपोषणही करण्यात आले. त्यामुळे शौचालय बांधकाम कागदावरच ‘स्वच्छ’ असल्याच्या शंकेला वाव निर्माण झाला आहे.
अनिल गवई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील शौचालय उभारणीत लाभार्थ्यांची फसवणूक आणि कंत्राटदाराने अनुदान लाटल्याची वस्तुस्थिती काही दिवसांपूर्वीच जळगाव जामोद तालुक्यात समोर आली. तसाच काहीसा प्रकार आता खामगाव तालुक्यात उजेडात आला असून, संग्रामपूर तालुक्यात शौचालय बांधकामातील भ्रष्टाचाराविरोधात उपोषणही करण्यात आले. त्यामुळे शौचालय बांधकाम कागदावरच ‘स्वच्छ’ असल्याच्या शंकेला वाव निर्माण झाला आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील सर्वच शहरांसोबतच ग्रामीण भागातही स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत असली तरी, जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये या अभियानाला भ्रष्टाचाराच्या वाळवीने पोखरल्याचे दिसून येते. संग्रामपूर तालुक्यात उघड्यावरील हगणदरीमुक्त गावातच मोठ्या प्रमाणात हगणदरी सुरू असल्याचे दिसून येते, तर याच तालुक्यातील पेसोडा येथे लाभार्थ्यांनी अनुदान लाटल्यानंतरही शौचालयांची उभारणी न केल्याचा प्रकार गावकºयांनीच उघडकीस आणला. या प्रकाराविरोधात फेब्रुवारी महिन्यात संग्रामपूर तहसील कार्यालयावर काहींनी उपोषणही केले, तर काहींनी हगणदरीमुक्त गावांच्या यादीलाच थेट आव्हान दिल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात डिसेंबरमध्ये आदिवासी लाभार्थ्यांच्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला होता. त्याचवेळी या तालुक्यातील ४७ पैकी ४४ गावे डिसेंबरमध्ये हगणदरीमुक्त घोषित करण्यात आली होती. उल्लेखनीय म्हणजे या कालावधीतच भिंगारा आणि चाळीसटापरीमध्ये शौचालय बांधकामातील अनियमितता चव्हाट्यावर आली होती.
त्यानंतर आता खामगाव तालुक्यातील चिंचपूर, कंडारी, भंडारी आणि जयपूर लांडे येथील शौचालय बांधकामात अनियमिता असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. चिंचपूर येथे कंत्राटदारानेच शौचालयांची उभारणी केली असल्याचे उघडकीस आले असून, एकाच लाभार्थ्यांनी दोन वेळा अनुदान लाटल्याचाही प्रकार समोर आला आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानातंर्गत उभारणी करण्यात आलेल्या शौचालयांची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा येथे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी लक्ष घातल्यानेच येथील लाभार्थ्यांची फसवणूक टळली होती. शिवाय लाभार्थ्यांना सिमेंट विटांऐवजी मातीच्या विटांद्वारे शौचालय बांधकाम करून देण्यात आले होते. हे येथे उल्लेखनीय!
हगणदरीमुक्त गावांच्या यादीवर प्रश्नचिन्ह!
बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये एकूण ८६६ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये मार्च २०१८ अखेरीस तीन लाख ५१ हजार ९२८ शौचालयांचे बांधकाम करण्यात आल्याचे दर्शवित जिल्हा हगणदरीमुक्त म्हणून घोषित करण्यात आला; मात्र ८६६ पैकी हगणदरीमुक्त घोषित झालेल्या ग्रामपंचायतीतही उघड्यावर हगणदरी सुरू असल्याचे चित्र आहे.
वरिष्ठांच्या बडग्यामुळे गोंधळ!
फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी शासनाच्या आदेशान्वये विभागीय आयुक्तांनी संबंधित प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. या सूचना मिळाल्यानंतर जिल्हा स्तरावर ‘मिशन मोड- ९० डेज’ अभियान राबविण्यात आले. या अभियानामुळे शौचालय बांधकामास निश्चितच गती मिळाली होती; मात्र वरिष्ठांच्या बडग्यामुळे लाभार्थी निवड प्रक्रियेत गोंधळ निर्माण झाल्याचे आता समोर येत आहे.
कंत्राटदाराकडून शौचालय बांधकाम करावे, असे कोणतेही लेखी आदेश देण्यात आलेले नाही. शौचालय बांधकामात अनियमिततेची तक्रार अद्याप आपणाला प्राप्त नाही. तक्रार प्राप्त झाल्यास कारवाई केली जाईल.
- किशोर शिंदे, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, खामगाव.
शौचालय बांधकामात मेहकरची आघाडी!
शौचालय बांधकामाच्या उद्दिष्टपूर्तीत मेहकर तालुक्यात सर्वाधिक ४० हजार ८६१ शौचालयांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ चिखली (४० हजार ५६७) तर बुलडाणा तालुका (३८ हजार ३०२) तिसºयास्थानी आहे. खामगाव तालुका (३८ हजार २६५) चौथ्या स्थानी असून, शौचालय बांधकामात शेगाव (१६ हजार ६०५) आणि देऊळगाव राजा कमालीचा माघारलेला असून, सर्वात शेवटचा क्रमांक देऊळगाव राजा (१४ हजार ४२७) तालुक्याचा लागतो.