अनुसूचित जमाती कल्याण समितीचा बुलडाणा दौरा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 02:05 PM2018-09-25T14:05:10+5:302018-09-25T14:05:24+5:30
बुलडाणा: जिल्ह्यात २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान येणाऱ्या २३ सदस्यीय अनुसूचित जमाती कल्याण समितीचा दौरा रद्द झाला असून आॅक्टोबर महिन्यात ही समिती जिल्ह्यात दाखल होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
बुलडाणा: जिल्ह्यात २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान येणाऱ्या २३ सदस्यीय अनुसूचित जमाती कल्याण समितीचा दौरा रद्द झाला असून आॅक्टोबर महिन्यात ही समिती जिल्ह्यात दाखल होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. या समितीच्या आगमनानिमित्त जिल्ह्यातील सर्वच प्रशासकीय कार्यालयात सुरू असलेली धावपळ त्यामुळे थंडावली आहे. समिती प्रमुख आ. डॉ. अशोक उईके, प्रभुदास भिलावेकर, पास्कल धनारे, संजय पुराम, राजाभाऊ वाजे, शांताराम मोरे, अमित घोडा, डॉ. संतोष टारफे, वैभव पिचड, पांडुरंग बरोरा, गोपीकिसन बाजोरिया, आनंद ठाकूर, चंद्रकांत रघुवंशी, श्रीकांत देशपांडे या १५ आमदारांचा या समितीमध्ये समावेश आहे. ही समिती २७ स्पेटंबर रोजी बुलडाणा जिल्ह्यात येणार असल्याने प्रशासकीय पातळीवर मोठी धावपळ सुरू होती. त्यामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासनच कामाला लागले. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेसह, पोलिस विभाग, शिक्षण विभागाने समितीला आवश्यक असलेल्या कागदपत्रांची, माहिती तथा टिपण्या बनविण्यास प्रारंभ केला होता. मात्र आता तांत्रिक अडचणीमुळे वेळेवर या समितीचा दौरा रद्द झाला आहे. त्यामुळे ही समिती आता पुढील महिन्यात जिल्ह्यात दाखल होणार असल्याचे संकेत सुत्रांनी दिली. समिती प्रमुखांच्या स्वीय सहाय्यकांनी तथा अकोला येथील एकात्मिक आदिवासी विकाल प्रकल्प कार्यालयातील सुत्रांनीही यास दुजोरा दिला आहे. पुढील महिन्यात जिल्हाधिकारी आणि समितीमधील सदस्य तथा अधिकारी यांच्या तारखांचे नियोजन झाल्यानंतर प्रत्यक्षात या दौर्यास आकार येईल, असे सुत्रांनी स्पष्ट केले.
बिंदू नामावली, पदभरतीवर लक्ष केंद्रीत
बिंदू नामावलीनुसार पदोन्नतीसह अन्य कामे झाली आहेत का? पदभरती करणांना अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण डावलल्या गेले तर नाही ना?, आदिवासी विभागासाठी येणारा निधी नियमानुसार खर्च झाला किंवा कमी प्राप्त झाला तथा नियमबाह्य तो खर्च केला गेला का? तथा हा निधी व्यपगत होण्याचे प्रमाण या संदर्भाने ही समिती जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, पालिकांना भेटी देऊन माहिती जाणून घेणार होती. सोबतच पोलिस अधीक्षक कार्यालय, महावितरण, राज्य उत्पादन शुल्क, राज्य परिवहन महामंडळ, जिल्हा परिषद, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अकोलातंर्गत कार्यालयातील अनुसूचित जमाती, अधिकारी/कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष व जात पडताळणी विषक बाबी संदर्भात जिल्ह्यातील सविस्तर माहिती जाणून घेणार होती.
जिल्ह्यातील चार तालुक्यात आदिवासी लोकसंख्या
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर, खामगाव आणि मेहकर तालुक्यात प्रामुख्याने आदिवसींची लोकसंख्या एकवटलेली आहे. त्यातल्या त्यात प्रामुख्याने २२ गावामधील लोकसंख्या अधिक आहे. त्यांच्या दृष्टीनेही हा समिती दौरा महत्त्वाचा होता.