बुलडाणा : विभाग नियंत्रक अनिल मेहतर यांच्यावर एसीबीचा ट्रॅप; वाहन परीक्षकाच्या बदलीसाठी मागितले दहा हजार रुपये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 07:32 PM2017-12-28T19:32:18+5:302017-12-28T19:41:16+5:30
बुलडाणा : राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा आगारामध्ये वाहन निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्यास बुलडाणा विभागीय कार्यशाळेत बदली देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने राज्य परिवहन महामंडळाचे बुलडाणा येथील विभाग नियंत्रक अनिल दत्तात्रय मेहतर यांना गुरूवारी सायंकाळी ताब्यात घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा आगारामध्ये वाहन निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्यास बुलडाणा विभागीय कार्यशाळेत बदली देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने राज्य परिवहन महामंडळाचे बुलडाणा येथील विभाग नियंत्रक अनिल दत्तात्रय मेहतर यांना गुरूवारी सायंकाळी ताब्यात घेतले.
दरम्यान, रात्री उशिरा पर्यंत लाचेची मागणी केल्या प्रकरणात त्यांच्या आवाजाचे नमूने आणि अन्य प्रक्रिया लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गुंतलेला होता. या प्रकरणात विजय प्रताप पवार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यांचा मामेभाऊ राजकुमार तारासिंग राठोड याच्या विभागीय कार्यशाळेतील बदलीसाठी विभाग नियंत्रक यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याची ही तक्रार २२ डिसेंबर रोजी करण्यात आली होती. त्यांच्या तक्रारीच्या आधारावर पडताळणी कार्यवाही झाली. त्यामध्ये पंचा समक्ष विभाग नियंत्रक अनिल दत्तात्रय मेहतर (४४,, मुळ रा.रेंदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांनी दहा हजार रुपयांची लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले होते. या प्रकरणी अनिल मेहतर यांच्या विरोधात गुरूवारी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम सात आणि १५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधीक्षक सुनीता नाशीककर यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीचे बुलडाणा येथील पोलिस उपअधीक्षक शैलेष जाधव, एएसआय श्याम भांगे, पोलिस हेडकॉन्स्टेबल राजू जवंजाळ, विष्णू नेवरे, पोलिस नाईक संजय शेळके, प्रदीप गडाख, पोलिस कॉन्स्टेबल विजय वारूळे, विजय मेहेत्रे, जगदीश पवार, विनोद लोखंडे, मधुकर रगड यांनी केली.
संपत्तीची चौकशी
दहा हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणात एसीबीने अनिल मेहतर यांना ताब्यात घेतले असले तरी त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नव्हती. मात्र या घटनेमुळे मेहतर यांच्या संपत्तीची मात्र आता लाच लुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करणार असल्याचे संकेत सुत्रांनी दिली. दरम्यान, गुरूवारी रात्री उशिरापर्यंत अनिल मेहतर यांच्या आवाजचे नमुने व तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीची कारवाई सुरू होती.