बुलडाणा: सुधारीत पैसेवारी ६९ पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 03:35 PM2019-11-01T15:35:46+5:302019-11-01T15:36:24+5:30
डिसेंबरमध्ये जाहीर होणाऱ्या अंतिम पैसेवारी नेमकी किती येते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्हा प्रशासनाने ३१ आॅक्टोबर रोजी सुधारीत पैसेवारी जाहीर केली असून जिल्ह्याची सुधारीत पैसेवारीही ६९ पैसे आली आहे. दरम्यान, परतीच्या पावसामुळे झालेले नुकसान पाहता पैसेवारी किमान ५० पैशांच्या आत येईल, असा कयास व्यक्त केला जात होतो. मात्र प्रत्यक्षात सुधारीत पैसेवारी ही ६९ पैसे आली आहे. त्यामुळे आता डिसेंबरमध्ये जाहीर होणाऱ्या अंतिम पैसेवारी नेमकी किती येते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, ३० सप्टेंबर रोजी जिल्ह्याचा नजर अंदाज जाहीर करण्यात आला होता. त्यात जिल्ह्याची नजर पैसेवारी ही ७२ पैसे आली होती. त्यामुळे सुधारीत पैसेवारीही त्याच्या आसपास राहील असा अंदाज होता. मात्र २० आॅक्टोबरपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने कहर सुरू केल्याने शेतकºयांच्या हाताशी आलेल्या पीकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाच्या प्राथमिक अंदाजानुसार ७० टक्के खरीपाच्या पिकाचे नुकसान झाले असून साडेसात लाख हेक्टरपैकी पाच लाख १९ हजार १९६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकरी प्रभावीत झालेले आहेत. परिणामी सुधारीत पैसेवारीत त्याचा प्रभाव दिसने अभिप्रेत होते. मात्र प्रत्यक्षात सुधारीत पैसेवारी ही ६९ पैसे आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरनही जिल्ह्यात राजकारण तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दुसरीकडे जिल्ह्यातील १३ ही तालुक्यात हलक्या, मध्यम व भारीच्या जमीनीमध्ये प्रत्येकी तीन या प्रमाणे सुधारीत पैसेवारी काढण्यासाठी तब्बल नऊ हजार पीक कापणी प्रयोग करण्यात आल्यानंतर ही सुधारीत पैसेवारी आली असल्याचे स्पष्ट होत आहे. आता प्रत्यक्षात अंतिम पैसेवारी डिसेंबर महिन्यात जाहीर होणार आहे. त्याकडे सध्या लक्ष लागून आहे.