रेल्वेमार्गासाठी ‘बुलडाणा अर्बन’ १०० कोटींचे रेल्वे बॉण्ड खरेदी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:52 AM2021-01-08T05:52:12+5:302021-01-08T05:52:12+5:30
बुलडाणा : कोकण रेल्वेच्या धर्तीवर खामगाव-जालना रेल्वेमार्गाच्या पूर्णत्वासाठी महामंडळ स्थापन करून हा मार्ग प्रत्यक्षात आणण्यासाठी एकटी बुलडाणा अर्बन पतसंस्था ...
बुलडाणा : कोकण रेल्वेच्या धर्तीवर खामगाव-जालना रेल्वेमार्गाच्या पूर्णत्वासाठी महामंडळ स्थापन करून हा मार्ग प्रत्यक्षात आणण्यासाठी एकटी बुलडाणा अर्बन पतसंस्था १०० कोटी रुपयांचे रेल्वे बॉण्ड खरेदी करण्यास तयार असल्याचे बुलडाणा अर्बन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे. यासोबतच बुलडाणा आणि जालना जिल्ह्यांतील पतसंस्थांच्या माध्यमातून आणखी १०० कोटी रुपये या मार्गासाठी उभे करण्यात येतील, त्यासाठी आपण जातीने प्रयत्न करू, असेही राधेश्याम चांडक यांनी स्पष्ट केले आहे.
सध्या खामगाव-जालना रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी पाचसदस्यीय पथक बुलडाणा जिल्ह्यात आले असून, ८ जानेवारीला हे पथक खामगाव येथे भेट देणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांना विचारणा केली असता, त्यांनी ही बाब स्पष्ट केली. विशेष म्हणजे २०१३ मध्ये ज्यावेळी खामगाव-जालना रेल्वेमार्गाचा मुद्दा चर्चेत आला होता, त्यावेळीही त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना ही बाब स्पष्ट केली होती. आता तर त्याच्या पुढे जाऊन एकटी बुलडाणा अर्बन पतसंस्था या मार्गाच्या प्रत्यक्षात अस्तित्वात येण्यासाठी सकारात्मक असून, १०० कोटींचे रेल्वे बॉण्ड खरेदी करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. यासोबतच बुलडाणा जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे संचालक या नात्याने बुलडाणा आणि जालना जिल्ह्यांतील पतसंस्थांच्या माध्यमातून आणखी १०० कोटींचे रेल्वे बॉण्ड असे एकूण २०० कोटी रुपयांचे रेल्वे बॉण्ड खरेदी करण्यासाठी आपण प्राधान्याने पुढाकार घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे एकट्या बुलडाणा जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही २४ हजार कोटींची आहे. यासोबतच जिल्ह्यात सर्वच क्षेत्रांत केल्या जाणाऱ्या पतपुरवठ्यापैकी ८१ टक्के पतपुरवठा हा जिल्ह्यातील पतसंस्था करतात. त्यामुळे बुलडाणा आणि जालना जिल्ह्यांतून १०० कोटी रुपयांचे रेल्वे बॉण्ड उभारणे सहज शक्य असल्याचे संकेतच राधेश्याम चांडक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले आहेत. या पद्धतीने मार्गासाठी पैसा उपलब्ध केल्यास हा रेल्वेमार्ग प्रत्यक्षात अस्तित्वात येण्यास मोठी मदत मिळेल, असेही चांडक म्हणाले.
रेल्वेमार्ग सर्वेक्षण समिती सकारात्मक
खामगाव-जालना रेल्वेमार्गाची मागणी ही व्यापक आहे, त्यास मोठा जनाधार आहे, त्यानुषंगाने यासंदर्भातील रेल्वे मंत्रालयाला सादर करण्यात येणारा अहवाल सकारात्मकच असेल, असे संकेत सिंदखेड राजा येथे पाहणीदरम्यान या समितीचे प्रमुख तथा मुंबई सर्वेक्षण विभागाचे उपमुख्य परिचालन प्रबंधक सुरेश जैन यांनी सहा जानेवारी रोजी दिले होते. त्यातच आता या आठव्या सर्वेक्षणासोबतच बुलडाणा अर्बनसारखी पतसंस्था तब्बल १०० कोटींचे रेल्वे बॉण्ड खरेदी करण्याची तयारी दर्शवत आहे. परिणामी बाकी घडामोडीही सकारात्मक घडत असल्याचे चित्र आहे.