बुलडाणा : मेहकर उपविभागातील १५७ गावांमध्ये पाणीटंचाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:50 AM2018-04-24T01:50:35+5:302018-04-24T01:50:35+5:30

बुलडाणा : मेहकर तालुक्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता असणार्‍या ७५ व लोणार तालुक्यातील ८२ गावांमध्ये उपविभागीय अधिकारी यांनी पाणीटंचाई घोषित केली आहे. या गावांमध्ये महाराष्ट्र भूजल अधिनियम २00९ लागू करण्यात आला आहे.

Buldana: Water shortage in 157 villages of Mehkar subdivision! | बुलडाणा : मेहकर उपविभागातील १५७ गावांमध्ये पाणीटंचाई!

बुलडाणा : मेहकर उपविभागातील १५७ गावांमध्ये पाणीटंचाई!

Next
ठळक मुद्देप्रशासनाची घोषणा टंचाईग्रस्त गावांमध्ये  महाराष्ट्र भूजल अधिनियम लागू

लोकमत न्यूज नेटवर्क 
बुलडाणा : मेहकर तालुक्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता असणार्‍या ७५ व लोणार तालुक्यातील ८२ गावांमध्ये उपविभागीय अधिकारी यांनी पाणीटंचाई घोषित केली आहे. या गावांमध्ये महाराष्ट्र भूजल अधिनियम २00९ लागू करण्यात आला आहे. या अधिनियमानुसार अधिसूचित सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे ५00 मीटरच्या अंतरामध्ये कोणतीही व्यक्ती, कोणत्याही प्रयोजनासाठी कोणत्याही विहिरीचे खोदकाम करणार नाही, असे आदेश देण्यात आले आहेत.
  भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने पुरविलेल्या माहितीच्या आधारे सार्वजनिक पिण्याच्या स्त्रोतांभोवती निश्‍चित व अधिसूचित केलेल्या प्रभाव क्षेत्रात कोणतीही व्यक्ती कोणत्याही प्रयोजनासाठी विहिरीचे खोदकाम करणार नाही. प्रभाव क्षेत्रामधील किंवा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून एक किलोमीटर अंतरामध्ये यापैकी जे अधिक असेल अशा क्षेत्रातील अशी विहीर तात्पुरती बंद करणे, भूजल काढण्यासाठी विहीत करण्याच्या दृष्टीने विनीमय करण्यात येईल. भूजल पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होईल, अशी कोणतीही कृती कुणीही करणार नाही. या अधिनियमनातील विविध तरतुदींचा भंग झाल्यास दंड व शिक्षेकरिता संबंधित तहसीलदारांनी त्वरित अहवाल सादर करावयाचा आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे कायम व्यवस्थापन करण्यामध्ये आणि पाणी टंचाईच्या काळात स्रोतांचे संरक्षण करण्यासाठी ग्रामपंचायत जिल्हा प्राधिकरणास मदत करेल, असे मेहकर उपविभागीय अधिकारी यांनी कळविले आहे.

भीषण पाणी टंचाईची दाहकता; पाणी भरताना महिला विहिरीत पडली
सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, पाण्याच्या शोधासाठी महिलांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गोरेगाव येथे पाणी भरत असताना एक महिला विहिरीत पडली असताना तिचे चार युवकांनी प्राण वाचविले असून, उपरोक्त घटना २१ ला घडली. सिंदखेडराजा तालुक्यात १0५ गावे असून, त्यापैकी ५0 हून अधिक गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गोरेगाव, उमनगाव, सावंगी भगत यासह ८ गावात टँकरने पाणी पुरवठा होत असून, ४0 हून अधिक गावात विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे. पाण्याची दाहकता एवढी भयानक आहे की पाण्यासाठी रात्र जागून प्रतीक्षा करावी लागते. तालुक्यातील गोरेगाव येथे भीषण पाणीटंचाई असून, येथे टँकरने पाणी पुरवठा केल्या जातो. दिवसातून दोन वेळा एक टँकर फेर्‍या मारते. ग्राम पंचायतसमोरील आणि मंदिरामागील विहिरीत पाणी टाकल्या जाते. २१ ला दुपारी गावात टँकर आले असता पाणी भरण्यासाठी महिलांची एकच गर्दी उसळते. ग्रामपंचायतसमोर टँकर उभे राहिले आणि विहिरीत पाणी सोडत असताना धारेखाली हंडा भरावा म्हणून महिलांची चढाओढ लागली. या धामधुमीत माजी ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद गवई यांची बहीण कौसल्याबाई इंगळे पाणी भरण्यासाठी आल्या. पाणी भरत असताना त्यांचा तोल जावून त्या विहिरीत पडल्या. लागलीच गोंधळ उडाल्याने तेथे उपस्थित सुरेश कव्हळे, अनिल मोरे, सिराज पठाण, बाळू गवई यांनी कौसल्याबाईला वाचविण्यात यश आले. जखमी कौसल्याबाईला विहिरीतून बाहेर काढून तत्काळ साखरखेर्डा येथील दवाखान्यात आणून उपचार केले. त्या महिलेचे प्राण वाचविणार्‍या युवकांचे सर्वांनी कौतुक केले. उपरोक्त घटना घडली असताना ग्रामपंचायतमध्ये सचिवासह कर्मचारी हजर होते. त्यांची पाणी वितरणाची जबाबदारी असताना त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे ग्रामपंचायतीवर अनेकांनी रोष व्यक्त केला. सावंगीभगत सारखी वितरण व्यवस्था इतर गावांनी बजावली तर गोरेगावसारखा प्रसंग निर्माण होणार नाही. 
 

Web Title: Buldana: Water shortage in 157 villages of Mehkar subdivision!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.