बुलडाण्यात मिळणार सोशल पोलिसिंगला बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:35 AM2021-09-11T04:35:12+5:302021-09-11T04:35:12+5:30
अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव) यांची पोलीस उपायुक्त मुंबई शहर येथे बदली करण्यात आली आहे. सोबतच बुलडाणा उपविभागाचे ...
अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव) यांची पोलीस उपायुक्त मुंबई शहर येथे बदली करण्यात आली आहे. सोबतच बुलडाणा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सुदाम बरकते यांची उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. दोन्ही अधिकाऱ्यांची जिल्ह्यातील कारकीर्द चांगल्या कामगिरीमुळे चर्चेत राहिली. हेमराजसिंह राजपूत यांच्या जागी सहायक पोलीस अधीक्षक म्हणून पद सांभाळणारे श्रवण एस. दत्त हे बुलडाणा जिल्ह्यात अपर पोलीस अधीक्षकांचा पदभार स्वीकारणार आहेत, तर बरकते यांच्या जागी अकोला येथे शहर उपविभागीय अधिकारी म्हणून काम सांभाळलेले सचिन तुकाराम कदम हे बदलून येणार आहेत.
दामिनी पथक केले जाणार सक्षम
बुलडाणा उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून रुजू होणारे सचिन कदम यांच्या कामाची पद्धत पाहता ते उपविभागात सोशल पोलिसिंगवर भर देणार आहेत. सर्वांत आधी दामिनी पथक सक्षम करून सक्रिय करण्यात त्यांचा हातखंडा आहे, तर भरोसा सेलमध्ये पीडितांना सुरक्षेचा भरोसा देण्यासाठी विविध उपक्रमही राबविण्यात त्यांची एक वेगळी प्रतिमा आहे.