बुलडाणा जि.प. मध्ये सत्तेचा ‘फॉर्म्युला’ अडचणीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 12:57 AM2018-05-06T00:57:34+5:302018-05-06T00:57:34+5:30
खामगाव: बुलडाणा जिल्हा परिषदेतील सत्ता विकेंद्रीकरणाचा समान फॉर्म्युला अडचणीत सापडला आहे. अपेक्षेनुसार तसेच शीर्ष नेतृत्वाने दिलेल्या शब्दांनुसार सत्तेत भागीदारी मिळत नसल्याने भाजपमधील अंतर्गत धुसफूस वाढीस लागल्याचे दि
अनिल गवई।
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: बुलडाणा जिल्हा परिषदेतील सत्ता विकेंद्रीकरणाचा समान फॉर्म्युला अडचणीत सापडला आहे. अपेक्षेनुसार तसेच शीर्ष नेतृत्वाने दिलेल्या शब्दांनुसार सत्तेत भागीदारी मिळत नसल्याने भाजपमधील अंतर्गत धुसफूस वाढीस लागल्याचे दिसते.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने गतवर्षी सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यादांच यश मिळविले. २४ जागांवरील ऐतिहासिक विजयाची दखल वरिष्ठ स्तरावरून घेण्यात आली. नैसर्गिक मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने दुरावा धरल्यानंतर राष्ट्रवादीच्या ‘दांड्या’ने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला. यशात प्रामुख्याने घाटाखालील तीन आणि घाटावरील एक अशा चार सत्ताकेंद्राचा वाटा राहिला. निवडणुकीनंतर नवीन मित्रपक्ष राष्ट्रवादीची मनधरणी करण्यापासून तर भाजपमधील इच्छुकांची बोळवण करण्यासाठी अनेक लिखित-अलिखित फॉम्युले तयार झाले. यातूनच सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा समान फॉर्म्युला अस्तित्वात आला. भाजपमधील ४ प्रमुख सत्ताकेंद्र्रांमध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासह सभापतींपदेही विभागून घेण्याचे ठरले. यात अध्यक्षपदासाठी वर्षभराचा तर सभापतींसाठी सव्वा वर्षाचा कालावधी ठरविण्यात आला. इच्छुकांचीही नाराजी दूर करण्यात त्यावेळी यश आले. परिणामी, जिल्हा परिषदेवर भाजपला सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला; मात्र सत्तेच्या समान फॉर्म्युल्यानुसार आता कोणत्याही हालचालींची चिन्हे नजीकच्या काळात दिसून येत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेत भाजपमधील अंतर्गत धुसफूस वाढली असून, वरिष्ठांसमोर पेच निर्माण झाला आहे.
खामगाव पालिकेनंतर जिल्हा परिषदेत डोकेदुखी!
खामगाव पालिकेतील बांधकाम सभापतींच्या राजीनामा नाट्यावर पडदा पडत नाही, तोच जि.प.त भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. जि.प. अध्यक्षांसारख्या प्रतिष्ठेच्या पदासाठी इच्छुक असलेल्या सोबतच विविध विषय सभापतींपदासाठी ‘शब्द’ मिळालेल्यांचा तगादा असून, काहींनी वरिष्ठांशी याच कारणावरून ‘अबोला’ आणि ‘दुरावा’ धरला आहे. एकाची वरिष्ठांशी बाचाबाची झाल्याचीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
मलकापूरने मारली होती बाजी!
खामगाव मतदारसंघातील ९ पैकी ९ गट, खामगाव पालिका आणि पं. स.वर आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात तर ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्या मार्गदर्शनात भाजपला यश मिळाले. जळगाव जामोद पालिकेत, पंचायत समितीसह शेगाव पालिका आणि जळगाव जामोद विधानसभा क्षेत्रातील चारपैकी चार गटांमध्ये आ. संजय कुटे यांचे प्रयत्न फळास आले. परिणामी, जिल्हा परिषदेवर वर्चस्वासाठी आ. संजय कुटे आणि आ. आकाश फुंडकर यांच्या मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य प्रबळ दावेदार होते; मात्र जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समितीत फारशी कामगिरी न करताही जिल्हा परिषद अध्यक्षाचे पद आपल्या मतदारसंघाकडे खेचण्यात आ. चैनसुख संचेती यशस्वी ठरलेत, तर घाटावरील सत्ता केंद्र मानल्या जाणाºया जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांना महिला व बालकल्याण सभापती पदावर त्यावेळी समाधान मानावे लागले होते.
जिल्हाध्यक्षांचे कानावर हात!
सत्तेत प्रत्येकाला समान वाटा देण्याचे ठरले होते. पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य आणि नेत्यांमध्ये तसा समझोता झाला होता; मात्र सत्ता स्थापनेच्या वर्ष-सव्वा वर्षभरानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदासोबतच सभापती पदासाठीही कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही. त्यामुळे नेत्यांवर दबाव वाढत असतानाच, पक्षातंर्गत धुसफूस वाढीस लागत आहे. शीर्ष नेतृत्वासोबतच भाजपचे जिल्हाध्यक्षही यासंदर्भात बोलायला तयार नाहीत.