बुलडाणा : लॉकाडाउनमध्ये बिनधास्त प्रवास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 11:20 AM2020-04-25T11:20:55+5:302020-04-25T11:21:01+5:30
रस्त्यावर वाहनांची तपासणी किंवा विचारणा होत नसल्याने सध्या दुचाकींसह इतर वाहनही सुसाट फिरत असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लॉकडाउनच्या काळात अकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांच्या दुचाकी जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत. या आदेशाला सध्या जिल्ह्यात खो बसत आहे. २४ ठिकाणी आंतरजिल्हा चेकपोस्ट सोबत जिल्हांतर्गत असलेल्या मुख्य रस्त्यावर पोलीस तैनात असतानाही लॉकडाउनकाळात जिल्ह्यांतर्गत प्रवास बिनधास्त होत आहे. रस्त्यावर वाहनांची तपासणी किंवा विचारणा होत नसल्याने सध्या दुचाकींसह इतर वाहनही सुसाट फिरत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या पृष्ठभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरूवातीच्या १५ दिवसांमध्ये बघायला मिळाली. त्यानंतर अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली हळूहळू वाहने रस्त्यावर येताना दिसून येत आहेत. दरम्यान, राज्य शासनाने लॉकडाउनमध्ये काही अटी शिथील केल्याने सकाळी १२ वाजेपर्यंत अधिकच गर्दी रस्त्यावर झाली. अटी शिथील केल्या म्हणजे आपली कोरोनातून मुक्तता झाली या भ्रमात असलेले नागरिक आज रस्त्याने बिनदिक्कत फिरत आहेत.
जिल्ह्यात २१ कोरोना पॉझिटिव्ह होते; त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत ११ बाधीत रुग्णांचा अहवाल निगिटीव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी झाली. जिल्ह्यासाठी ही बाब दिलासादायक असली तरी अजूनही धोका टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घरी राहणे महत्त्वाचे असतानाही अनेक लोक वाहनाने फिरत आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विनाकारण दुचाकीने फिरणाऱ्यांच्या दुचाकी जप्त करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. परंतू या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचा प्रकार अनेक चेकपोस्टवर निदर्शनास आला.
संचारबंदीचे उल्लंघन; एक हजार गुन्हे
संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत एक हजारावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विविध कारवार्इंमधून साडे सहा लाख रुपयांपेक्षा जास्त दंडही वसूल करण्यात आला आहे. अफवा पसरविणाºयांवरही सध्या सायबर सेलची नजर आहे. अफवा पसरविल्याप्रकरणी आतापर्यंत १५ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.
मुख्य रस्त्याने वाहने सुसाट
जिल्ह्यातील मुख्य रस्त्यावर काही ठिकाणी पोलीस तैनात आहेत. परंतू दुचाकींसह इतर वाहने या रस्त्याने ये-जा करत असतांना त्यांची चौकशी होत नसल्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे वाहनातून नेमकी अत्यावश्यक सेवांचीच वाहतूक होते का? हा प्रश्नही उपस्थित होत आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनांना बंदी आहे. संचारबंदीचे उल्लंघन केल्यास तात्काळ कारवाई करण्यात येते. रस्त्यावर विनाकारण फिरणाºयांच्या दुचाकीधारकांवर कारवाई करण्यात येत आहे. काहींच्या दुचाकी जप्त केल्या असून, चौकशी अंती पूर्ण प्रक्रियेनंतर त्या सोडून दिल्या जातात.
- संदिप पखाले, अप्पर पोलीस अधिक्षक, बुलडाणा.