बुलडाणा जिल्हय़ातील ५0८ दुग्धोत्पादन संस्था निघाल्या अवसायनात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 01:31 AM2018-04-13T01:31:16+5:302018-04-13T01:31:16+5:30

बुलडाणा:  जिल्हय़ात जवळपास साडेसहा लाख लीटर दुग्धोत्पादन होत असतानाही जिल्हय़ातील ५८0 संस्थांपैकी ५0८ संस्था अवसायनात गेल्यामुळे जिल्हय़ातील दुग्धोत्पादनाला खीळ बसत आहे. दरम्यान, शासकीय व खासगी मिळून जिल्हय़ात वर्तमान स्थितीत ३0 हजार लीटर दूध संकलित केल्या जात असल्याचे वास्तव समोर आले आहे.

Buldhana 508 Milk Production Company closed! | बुलडाणा जिल्हय़ातील ५0८ दुग्धोत्पादन संस्था निघाल्या अवसायनात!

बुलडाणा जिल्हय़ातील ५0८ दुग्धोत्पादन संस्था निघाल्या अवसायनात!

Next
ठळक मुद्दे७२ संस्थांद्वारे ३0 हजार लीटर दुधाचे संकलन दुग्धोत्पादनावर जोर देण्याची अवश्यकता

नीलेश जोशी । 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा:  जिल्हय़ात जवळपास साडेसहा लाख लीटर दुग्धोत्पादन होत असतानाही जिल्हय़ातील ५८0 संस्थांपैकी ५0८ संस्था अवसायनात गेल्यामुळे जिल्हय़ातील दुग्धोत्पादनाला खीळ बसत आहे. दरम्यान, शासकीय व खासगी मिळून जिल्हय़ात वर्तमान स्थितीत ३0 हजार लीटर दूध संकलित केल्या जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. एकीकडे जिल्हय़ात राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ आणि मदर डेअरी फ्रुट्स अँन्ड व्हिजिटेबल लिमिटेडच्या माध्यमातून दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी ३५२ गावांची मध्यंतरी निवड करण्यात आली असली तरी अद्याप हा प्रकल्प राबविण्याच्या दृ्ष्टीने अपेक्षित हालचाली झालेल्या नाहीत.
परिणामी बुलडाणा जिल्हय़ात दुग्धोत्पादन वाढविण्यावर भर देण्याची गरज आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी (राज्यमंत्री दर्जा) येऊन गेलेत. त्यांनी जिल्हय़ातील एकंदर स्थितीचा अधिकार्‍यांकडून आढावा घेतला होता. त्यासंदर्भात सविस्तर माहिती घेतली असता ही बाब उघड झाली. विशेष म्हणजे विदर्भामध्ये यवतमाळनंतर शेतकरी आत्महत्यांमध्ये बुलडाणा जिल्हय़ाचा क्रमांक लागत असता शेती सिंचनासोबतच शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्यासाठी दुग्धोत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने घोषित योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, हा दृष्टिकोन समोर ठेवून योजना राबविणे क्रमप्राप्त असताना जिल्हय़ाची स्थिती दुग्धोत्पादनाबाबतीत काहीशी गंभीर असल्याचे चित्र आहे. 
दुसरीकडे जिल्हय़ात शासकीय दूध योजना १९७९ मध्ये कार्यान्वित करण्यात आली होती. त्यातंर्गत शासकीय दूध शीतकरण केंद्र मोताळा, चिखली आणि नांदुरा येथे उभारण्यात आले होते; मात्र यापैकी नांदुरा येथील योजना १ जून २0१0 तर मोताळा येथील शीतकरण केंद्र हे १६ जून २0१३ पासून बंद पडलेले आहे. या ठिकाणी योजनेची मोठी मालमत्ता असून यंत्रसामग्रीही धूळ खात पडून आहे. एकमेव चिखली येथील दूध शीतकरण केंद्र कार्यान्वित असून, येथे केवळ दीड हजार लीटर दुधाचे संकलन होत आहे. यावरून बुलडाणा जिल्हय़ातील एकंदरीत दुग्धोत्पादनाच्या स्थितीचे चित्र स्पष्ट व्हावे.
पंतप्रधान पॅकेज, मुख्यमंत्री पॅकेज, एकात्मिक दुग्ध विकास प्रकल्प, विदर्भ विकास पॅकेज, एकात्मिक दुग्ध विकास डेअरी फार्म प्रकल्प, आत्मांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना राबवूनही जिल्हय़ातील दुग्धोत्पादनाची स्थिती फारशी सुधारलेली नाही. त्यामुळे या प्रश्नी प्रशासकीय पातळीवर जोर देण्याची गरज आहे. दुसरीकडे ५८0 पैकी तब्बल ५0८ संस्था अवसायात गेल्यामुळे जिल्हय़ात आतापर्यंत या योजनेंतर्गत कोणते कार्य झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रत्यक्षात केवळ ७२ पंजीबद्ध संस्था सुरळीत सुरू असून, त्यांची स्थितीही फारसी समाधानकारक नसल्याचे चित्र आहे. २0१0 पासून जिल्हय़ात सातत्याने वर्ष दो वर्षाआड दुष्काळी स्थिती निर्माण होऊन जिल्हय़ातील दुग्धोत्पादनाला फटका बसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यातून जिल्हय़ातील स्थिती बदली असल्याचे  सूत्र सांगतात.

सध्याचे दूध संकलन
जिल्हा दूध संघाचे दीड हजार लीटर, दोन सहकारी संस्थांचे ५ हजार लीटर, सुप्रभात डेअरीचे १ हजार ७00 लीटर, मदर डेअरी प्रकल्पाचे १२ हजार लीटर व अन्य असे मिळून जिल्हय़ात तूर्तास केवळ ३0 हजार लीटर दुधाचे संकलन होत आहे. विशेष म्हणजे यातील जवळपास २४ हजार लीटर दूध हे जिल्हय़ाबाहेर नेल्या जात आहे. 

दुग्धोत्पादन वाढीसाठी ३५२ गावांची निवड!
आता दुग्धोत्पादन वाढीसाठी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळांतर्गत बुलडाणा, मेहकर, देऊळगाव राजा, नांदुरा, खामगाव आणि शेगाव या सहा तालुक्यातील ३५२ गावांची १७ ऑक्टोबर २0१६ मध्ये निवड करण्यात आली आहे; मात्र प्रत्यक्षात योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने अपेक्षित हालचाल नाही. सध्या अमरावती जिल्हय़ात अनुषंगिक उपक्रम राबविण्यात येत असून, बुलडाणा जिल्हय़ात पुढील काळत टप्प्या टप्प्याने प्रकल्प राबविण्यात  येणार असल्याचे कागदोपत्री नमूद आहे. विशेष म्हणजे मराठवाडा आणि विदर्भातील भागात दुग्धोत्पादन वाढीसाठई विशेष प्रकल्प राबविण्यात येत असून, त्यामध्ये बुलडाणा जिल्हय़ाचा समावेश करण्यात आला आहे. दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण, दुध देणार्‍या गुरांच्या अनुवांशिक सुधारणांच्या अधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कार्यक्रम व दुग्ध व्यावसायिकांना संघटित करणे या बाबींचा यात अंतर्भाव आहे. सोबतच अंमलबजावणी करताना उत्पादन व उत्पादकता वृद्धी, संस्थात्मक उभारणी, कृत्रिम रेतन सेवा दारापर्यंत पूरक पशुखाद्य, गाव पातळीवर पशुवैद्यकीय सेवा देणे या बाबींचा यात अंतर्भाव आहे; मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी स्तरावर ही योजना कार्यान्वित झालेली नाही.

जिल्हय़ात खासगी व शासनाचे मिळून सध्या ३0 हजार लीटर दुधाचे संकलन केले जाते. दुष्काळी स्थिती, व दुग्धोत्पादन कमी झाल्यामुळे तीन प्रकल्प बंद पडले आहे. अवसायनातील ५0८ संस्थांच्या पुनरुज्जीवनाच्या दृष्टीने प्रयत्न असून, त्यांचे अर्ज आल्यास अनुषंगिक कार्यवाही केल्या जाऊ शकते.
- डी. जे. सोळंकी, 
जिल्हा दुग्ध विस्तार अधिकारी, बुलडाणा
 

Web Title: Buldhana 508 Milk Production Company closed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.