बुलढाणा : नगर पालिकेच्या लेखी अजूनही अकोटकर हेच मुख्याधिकारी, खामगाव नगर पालिकेचा कारभार ढेपाळला
By अनिल गवई | Published: April 5, 2023 02:15 PM2023-04-05T14:15:31+5:302023-04-05T14:16:05+5:30
स्थानिक नगर पालिकेचे मुख्याधिकारी मनोहर अकोटकर ३१ मार्च रोजीच सेवा निवृत्त झाले.
खामगाव: स्थानिक नगर पालिकेचे मुख्याधिकारी मनोहर अकोटकर ३१ मार्च रोजीच सेवा निवृत्त झाले. त्यांचा निरोप समारंभही पालिकेत पार पडला. दरम्यान, अकोटकर यांच्या सेवानिवृत्तीला पाच दिवस लोटूनही त्यांचा नावाचा फलक पालिकेच्या दालनात आजही कायम आहे. त्यामुळे पालिकेच्या लेखी मुख्याधिकारी म्हणून मनोहर अकोटकर हेच कायम असल्याचे दिसून येते.
बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी नगर पालिका म्हणून खामगाव नगर पालिकेचा नावलौकीक आहे. मात्र, अलिकडच्या काळात खामगाव नगर पालिकेचा कारभार चांगलाच ढेपाळल्याचे दिसून येत आहे. येथील नगर पालिकेचे मुख्याधिकारी मनोहर अकोटकर ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीचा सोहळाही खामगाव पालिकेत साजरा झाला. त्यांच्या सेवानिवृत्तीला तब्बल पाच दिवस लोटले. त्यांचा कागदोपत्री प्रभार शेगाव नगर पालिकेच्या मुख्याधिकारी जयश्री काटकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. मात्र, त्यांनी अद्यापही खामगाव पालिकेचा प्रभार सांभाळेला नाही. परिणामी, खामगाव पालिकेचे कामकाज चांगलेच प्रभावित झाले आहे.
उपमुख्याधिकारी रजेवर, अनेकांची अघोषित सुटी
नगर पालिकेत मुख्याधिकारी नसतानाच उपमुख्याधिकारी दोन दिवसांच्या रजेवर गेले आहेत. बडे अधिकारी कार्यालयात नसल्याची संधी साधत काही अधिकारी आणि कर्मचारी अघोषित सुटीचा आनंद घेत आहेत. त्यामुळे पालिकेत सर्वकाही ऑलबेल असल्याचे चित्र दिसून येत आहे. मंगळवारी आणि बुधवारी कार्यालयीन वेळेत अनेक कर्मचारी गायब असल्याचे दिसून आले. उपमुख्याधिकारी वगळता कुणाच्याही सुटीचा अर्ज कार्यालयात नव्हता. वरिष्ठांचा वचक नसल्यामुळे अनेक अधिकारी, कर्मचारी चालढकल वृत्तींने कामकाज करीत असल्याने पालिकेचे कामकाज चांगलेच प्रभावित झाले आहे.
कचरा व्यवस्थापन ढेपाळले, कर वसूली रखडली
स्थानिक नगर पालिकेच्या कचरा व्यवस्थापनाचे धिंडवडे विधानसभेत निघाले. त्यानंतरही शहरातील कचरा व्यवस्थापनात कोणत्याही प्रकारचा बदल झालेला दिसून येत नाही. त्याचवेळी पालिकेची कर वसुलीही अपेक्षेप्रमाणे होत नसल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर येत आहे. बांधकाम, पाणी पुरवठा, विद्युत या विभागासोबतच वृक्ष आणि इतर विभागातही मंगळवारी आणि बुधवारी कर्मचार्यांची संख्या रोडावल्याचे दिसून आले.