Buldhana: तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा..., विदर्भ पंढरीनाथ श्री गजाननाच्या चरणी लक्षावधी भाविक लिन
By अनिल गवई | Published: March 3, 2024 02:35 PM2024-03-03T14:35:16+5:302024-03-03T14:35:35+5:30
Gajanan Maharaj Prakat Din: विदर्भ पंढरीनाथ श्री गजानन महाराजांच्या १४६ व्या प्रकट दिन महोत्सवानिमित्त शेगाव नगरीत हजारो भाविक रविवारी श्रींच्या चरणी नतमस्तक झाले. ‘तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा...’ या ओळीचा प्रत्यय देत महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील भाविकांनी भजनी दिंडीद्वारे श्रींच्या चरणी लीन झाले.
- अनिल गवई
बुलढाणा - विदर्भ पंढरीनाथ श्री गजानन महाराजांच्या १४६ व्या प्रकट दिन महोत्सवानिमित्त शेगाव नगरीत हजारो भाविक रविवारी श्रींच्या चरणी नतमस्तक झाले. ‘तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा...’ या ओळीचा प्रत्यय देत महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील भाविकांनी भजनी दिंडीद्वारे श्रींच्या चरणी लीन झाले. वारकरी आणि भाविकांची अलोटगर्दी गत आठदिवसांपासून शेगावात होत आहे.
संतनगरी शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानमध्ये २६ फे बु्रवारीपासून श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्याला सुरूवात झाली. प्रकट दिनानिमित्त सुरू असलेल्या महारूद्रस्वाहाकारयागामुळे श्रींच्या मंदिरातील वातावरण धार्मिक बनले असून, नामजप...भजन आणि किर्तनामुळे वारकरी, भाविक भक्तीरसात न्हावून निघताहेत. रविवारीसकाळपासूनच मंदिरात तसेच प्रकट स्थळी श्रींचा प्रकटदिन महोत्सव साजरा झाला. श्रींच्या मंदिरात संस्थानच्या विश्वस्तांच्या हस्ते अभिषेक आणि विविध धार्मिक सोपस्कार विधिवत पार पडले.
प्रकट दिन सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी सातशेच्यावर भजनी दिंडी पायी शेगावात दाखल झाल्या आहेत. त्याचवेळी रविवारी पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांची अलोटगर्दी दिसून आली. यामध्ये महिला भाविकांची संख्या लक्षणिय अशी आहे. शेगावात दाखल होणाºया भाविकांची मनोभावे सेवा श्री गजानन महाराज संस्थानसोबतच विविध धार्मिक, सामाजिक संस्था आणि राजकीय पुढाºयांकडून करण्यात आली. यात चहा, नास्ता, पिण्याचे शुध्द पाणी, वैद्यकीय सेवा, पादत्राण ठेवण्याची सुविधा आदी भाविक, वारकºयांना भक्तीभावाने पुरविण्यात आल्या. प्रकटदिनानिमित्त मनोभावे दर्शनासाठी काही भाविक मंदिरात दाखल झाले. गर्दी, स्वास्था अभावी अनेकांनी दुरूनच कलश दर्शन, प्रकटस्थळी दर्शन घेतले. इतकेच नव्हेतर मंदिराच्या प्रवेशद्वारावर माथा टेकवित श्रध्देचा अभिषेक केला. मंदिर परिसरात हार, फुले, प्रसाद आणि धार्मिक साहित्यांची मोठ्याप्रमाणात दुकाने थाटली होती.
आरतीच्या वेळी पुष्पवृष्टी
श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त दुपारी बारा वाजता मध्यान आरती करण्यात आली या आरतीच्या वेळी भाविकांनी मंदिरावर पुष्पवृष्टी केली. या क्षणी भाविकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.