तीनही मतदारसंघात भाजपची मुसंडी, संचेती सहाव्यांदा, कुटे पाचव्यांदा, फुंडकरांची हॅट्ट्रिक!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 04:24 PM2024-11-23T16:24:13+5:302024-11-23T16:27:59+5:30
Buldhana Assembly Election Result 2024 : २० हजारांपेक्षाही अधिक मतांनी तिघांचाही विजय : काँग्रेसने मलकापूर गमावले
- सदानंद सिरसाट
Buldhana Vidhan Sabha Election Result 2024 Live : खामगाव (बुलढाणा) : बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील आधीच दोन मतदारसंघ ताब्यात असताना तिसराही म्हणजे मलकापूर मतदारसंघही आता भाजप महायुतीने ताब्यात घेतला आहे. मलकापुरात चैनसुख संचेती, जळगावात डाॅ. संजय कुटे तर खामगावात ॲड. आकाश फुंडकर या तिघांनीही प्रतिस्पर्ध्यापेक्षा तब्बल २० हजारांपेक्षाही अधिक मते घेत विजय मिळवला आहे. त्यापैकी संचेती सहाव्यांदा, डाॅ. कुटे यांचा पाचव्यांदा विजय झाला आहे. तर ॲड. फुंडकर यांची हॅट्ट्रिक झाली आहे.
खामगाव मतदारसंघात महायुतीतील भाजपचे ॲड. आकाश फुंडकर यांना प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार दिलीपकुमार सानंदा यांच्यापेक्षा २५१३८ मते अधिक मिळाली आहेत. त्याचवेळी या दोन्ही उमेदवारांना अनुक्रमे १०४७५६ व ७९६१८ मते मिळाली आहेत. तर वंचित बहुजन आघाडीचे देवराव हिवराळे यांना २४९९८ मते मिळाली आहेत. जळगाव जामोद मतदारसंघात भाजपचे आमदार डॉ. संजय कुटे यांना १०७३१८ मते मिळाली आहेत. तर काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार डाॅ. स्वाती वाकेकर यांना ८८५४७ मिळाली आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे डाॅ. प्रवीण पाटील यांना १७६४८, तर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांना ९९८३ मते मिळाली आहेत. डाॅ. कुटे यांचा १८७७१ मतांनी पाचव्यांदा विजय झाला आहे. मलकापुरात भाजप महायुतीचे चैनसुख संचेती यांचा २०१९ चा अपवाद वगळता त्यांचा सहाव्यांदा विजय झाला आहे. त्यांना यावेळी १०९९२१ मते मिळाली आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेस महाविकास आघाडीचे राजेश एकडे यांना ८३५२४ मते मिळाली आहेत. विजयामध्ये २६३९७ मतांचा फरक आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मो. जमीरुदिन मो. साबीरउदीन यांना ९२५३ मते मिळाली आहेत.
वंचितच्या उमेदवारांच्या मतांचा आघाडीला फटका
वंचित बहुजन आघाडीच्या खामगाव आणि जळगाव जामोद मतदारसंघातील उमेदवारांना मिळालेल्या मतांएवढाच विजयी मतांचा फरक आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना ती मते मिळाली असती तर मतदारसंघातील चित्र वेगळे असते, अशी चर्चा आहे.