माळेगावात चार मुलींसह महिलेचा मृतदेह विहीरीत आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:34 AM2019-09-23T10:34:49+5:302019-09-23T11:03:05+5:30
सामुहिक आत्महत्या केली की हा घातपाताचा प्रकार आहे, याबाबत अद्याप स्पष्टपणे माहिती समोर आलेली नाही.
जानेफळ (जि. बुलडाणा): मेहकर तालुक्यातील आदिवासी ग्राम म्हणून ओळखल्या जाणाºया माळेगाव येथील एकाच कुटुंबातील चार मुली व त्यांच्या आईचे मृतदेह गावालगतच्याच विहीरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, त्यांनी सामुहिक आत्महत्या केली की हा घातपाताचा प्रकार आहे, याबाबत अद्याप स्पष्टपणे माहिती समोर आलेली नाही. उज्वला बबन ढोके (३५) या महिलेसह त्यांच्या चार मुली वैष्णवी बबन ढोके (९), दुर्गा बबन ढोके (७), आरूषी बबन ढोके (४) आणि पल्लवी बबन ढोके (१) अशी मृतांची नावे आहेत. सोमवारी (दि २३) पहाटे माळेगाव लगत असले्या तुळशीराम चोंडकर यांच्या शेतातील विहीरीत प्रारंभी चारही मुलींचे मृतदेह आढळून आले. त्यांनंतर जानेफळचे तंटामुक्त समिती अध्यक्ष कृष्णा हावरे आणि काही पट्टीच्या पोहणाºया युवकांनी उज्वला बबन ढोके या महिलेचाही विहीरीतील गाळात फसलेला मृतदेह बाहेर काढला आहे. उज्वला बबन ढोके या रविवारी शेतातामध्ये उडीद सोंगण्यासाठी आपल्या चारही मुलींसह जात असल्याचे घरी सांगून गेल्या होत्या. मात्र सायंकाळी त्या परत आल्या नाहीत. त्यामुळे उज्वला ढोके या महिलेचा दीर व सासºयाने त्यांचा परिसरात ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेतला. मात्र त्या आढळून आल्या नाहीत. मात्र २३ सप्टेंबर रोजी तुळशीराम चोंडकर यांच्या शेतातील विहीरीत चार मुलींचे मृतदेह आढळून आले. विहीरीलगतच त्यांच्या चपलाही आढळून आल्या. प्रारंभी महिलेचा शोध लागला नाही. ग्रामस्थांनी विहीरीत खाली उतरून पाहिले असता महिलेचाही मृतदेह विहीरीत असल्याचे निदर्शनास आले. सध्या पाचही जणींचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे अशी माहिती पोलिस पाटील वंदना गाढवे (माळेगाव) आणि तंटामुक्त समिती अध्यक्ष कृष्णा हावरे (जानेफळ) यांनी दिली. उज्वला ढोके यांनी चारही मुलींसह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली की हा घातपाताचा प्रकार आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. जानेफळ पोलिस सध्या घटनास्थळाकडे रवाना झाले असून ज्या ठिकाणी ही घटना घडली तो भाग डोंगराळ आहे. या घटनेबाबत माळेगावच्या पोलिस पाटील वंदना गाढे यांनी जानेफळ पोलिसांना माहिती दिली.
महिनाभरापूर्वी पतीचेही निधन
मृत उज्वला बबन ढोके या महिलेच्या पतीचेही सुमारे एक महिन्यापूर्वी विषारी औषध प्राशन केल्याने निधन झाले होते, असे ग्रामस्थांनी सांगितले. त्यानंतर महिनाभरातच हा दुर्देवी प्रकार घडला आहे.