बुलडाण्याच्या श्रीकांत वाघने इंग्लंडमध्ये घेतल्या दहा विकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 04:59 PM2018-07-02T16:59:51+5:302018-07-02T17:03:00+5:30
बुलडणा : दहा वर्षाच्या प्रथमश्रेणी तथा आयपीएल स्पर्धेतील अनुभवाच्या जोरावर दुखापतीमधून सावरत थेट इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्या नॉर्थ यॉर्कशायर अॅन्ड साऊथ डरहम (एनवायएसडी) क्रिकेट लीगमधील एक दिवशीय सामन्यात दहा गडी बाद करीत बुलडाण्याच्या श्रीकांत वाघने विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
- नीलेश जोशी
बुलडणा : दहा वर्षाच्या प्रथमश्रेणी तथा आयपीएल स्पर्धेतील अनुभवाच्या जोरावर दुखापतीमधून सावरत थेट इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्या नॉर्थ यॉर्कशायर अॅन्ड साऊथ डरहम (एनवायएसडी) क्रिकेट लीगमधील एक दिवशीय सामन्यात दहा गडी बाद करीत बुलडाण्याच्या श्रीकांत वाघने विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. डावखुरा मध्यमगती गोलंदाज तथा प्रसंगी आपल्या फलंदाजीच्या जोरावर सामना फिरवण्याची ताकद ठेऊन असलेल्या श्रीकांतने शनिवारी (३० जून) झालेल्या या समान्यात अचूक टप्प्यावर मारा करीत स्वींगची जादू दाखवत ही कमाल केली. स्टॉकेस्टली क्रिकेट क्लबच्या मैदानावर मिडल्सब्रो विरुद्ध हा सामना झाला होता. त्यात ११.४ ओव्हरमध्ये ३९ धावा देत दहा गडी बाद करण्याची कमाल श्रीकांतने केल्याने मिडल्सब्रो संघ अवघ्या ९७ धावात गारद करीत १३५ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करीत स्टॉकेस्टली क्रिकेट क्लबने २२७ धावांचे लक्ष मिडल्सब्रो संघासमोर ठेवल होते. त्यात स्टॉकेस्टलीचा कर्णधार अॅन्ड्र्यू वेगवेल याने ८०, जेम्स वेगवेल याने ५७ तर श्रीकंत वाघने २८ चेंडूत चार षटकार आणि एका चौकाराच्या जोरावर ४१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीकांतच्या वेगवान मारा आणि स्वींगच्या चपाट्यात सापडलेल्या मिडल्सब्रो संघाला अवघ्या ९७ धावा करता आल्या. त्यात मार्क ग्लोसनच्या सर्वाधिक २८ धावा होत्या. विशेष म्हणजे या स्पर्धेतील मिडल्सब्रोचा संघ हा एक उत्तम व दर्जेदार संघ आहे. त्या संघाविरोधात श्रीकांतने ही कामगिरी केली आहे. दरम्यान, सातासमुद्रापार व्यावसायिक क्रिकेटर म्हणून स्टॉकेस्टली (स्टोक्सले) क्रिकेट क्लबकडून एप्रिल २०१८ पासून श्रीकांत एनवायएसडी लिगमध्ये खेळत आहे. आठ सप्टेंबर पर्यंत श्रीकांत इंग्लडमध्ये आहे. २०११ मध्ये पुणे वॉरिअरर्सकडून श्रीकांत वाघ आयपीएल खेळला होता. त्यानंतर आता दुसर्यांदा तो स्टॉकेस्टली क्रिकेट क्लबसाठी खेळत आहे. शनिवारी ३० जून रोजी झालेल्या या सामन्यात तीन षटकांच्या स्पेलमध्ये त्याने सात विकेट पटकावल्या होत्या. सोबतच कामगिरी उंचावत त्याने या संपूर्ण सामन्यात दहा गडी बाद करण्याची कमाल केली आहे. विदर्भाकडून खेळताने श्रीकांतने चांगली कामगिरी केली आहे. विदर्भाचा तो एक उत्तम मध्यमगती गोलंदाज असून भारताचे माजी प्रशिक्षण जॉन राईट यांनी त्याच्यातले नैसर्गिक गुण हेरले होते.
बुलडाण्याच्या वाघाने भरारी घेतली
दुखापतीमुळे गेल्या दोन वर्षामध्ये फारसी दमदार कामगिरी करू न शकलेल्या श्रीकांतने स्टॉकेस्टली क्रिकेट क्लब कडून खेळताना त्याने आता ही कामगिरी केली आहे. असे क्षण क्रिकेटमध्ये फारच कमी येतात. मात्र बुलडाण्याच्या तथा भारत विद्यालयाच्या माजी खेळाडूने हे करून दाखवल आहे. त्याचा बुलडाण्यासह विदर्भालाही अभिमान आहे, असे भारत विद्यालय क्रिकेट अकॅडमीचे संजय देवल यांनी यासंदर्भात ‘लोकमत’ ला प्रतिक्रिया देताना सांगितले.
दुखापतीतून सावरला
गुडघ्याला दुखापत झाल्याने गेल्या दोन वर्षापासून श्रीकांतच्या कारकिर्दीत चढउतार आले होते. विदर्भाच्या संघात त्याला स्थान मिळवता आले नव्हते. त्यामुळे तो काहीसा दबावात होता. त्यातच ३० जून रोजीच्या त्याच्या या चमकदार कामगिरीमुळे आयपीएलसह, विदर्भाच्या संघाचे तथा प्रसंगी भारताच्या संघाचेही दार उघडे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बुलडाण्याच्या भारत विद्यालयाकडून शालेय जीवनात खेळतांना त्याने सहा वर्ष राज्यस्तर, चार वेळा राष्ट्रीयस्तरावर प्रतिनिधीत्व केले आहे. महाराष्ट्राकडून खेळतानाही त्याने चमकदार कामगिरी केली होती.