बुलढाणा : पाच दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता
By विवेक चांदुरकर | Published: April 21, 2023 05:00 PM2023-04-21T17:00:02+5:302023-04-21T17:00:26+5:30
पाच दिवस जिल्ह्यात हलका अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
खामगाव : गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर आता पुन्हा आगामी पाच दिवस जिल्ह्यात हलका अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
भारतीय हवामान खात्याने २१ एप्रिल रोजी वर्तविलेल्या पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात २१ ते २५ एप्रिलदरम्यान तुरळक, काही ठिकाणी हलक्या अवकाळी पावसाची शक्यता आहे. २१, २२, २४ व २५ एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. २१, २४ व २५ एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता पाहता शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या शेतमालाची, भाजीपाल्याची व तोडणी केलेल्या फळांची योग्य ती काळजी घ्यावी, तसेच संबंधित शेतमाल, भाजीपाला व फळे सुरक्षित ठिकाणी ठेवावे. सध्याचे तापमान व वादळी वाऱ्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी शेतामध्ये पिकांचे अवशेष जाळू नये, तसेच हवामान परिस्थिती पाहता पिकांना, फळबागांना व भाजीपाला पिकांना वाढीच्या अवस्थेत पाण्याचा ताण बसू नये म्हणून नियमितपणे शक्यतो सूक्ष्म सिंचन पद्धतीने ओलीत करावे, कांदा पीक परिपक्व अवस्थेत असताना किंवा काढणीच्या ८-१५ दिवस अगोदर ओलीत बंद करावे. त्यामुळे कांदा काढणे सोयीचे होईल, असा सल्ला देण्यात आला आहे.
जनावरांना धोका
मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावीत. जनावरांना उघड्यावर चरायला जाऊ न देता, त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था गोठ्यातच करावी. विजांबाबत अचूक पूर्वसूचना प्राप्त होण्यासाठी व जीवितहानी टाळण्यासाठी शेतकरी बंधूंनी दामिनी मोबाइल अॅपचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय हवामान खात्याने २१ एप्रिल रोजी वर्तविलेल्या पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात २१ ते २५ एप्रिलदरम्यान तुरळक, काही ठिकाणी हलक्या अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिक, शेतकरी, पशुपालकांनी सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे.
मनेष येदूलवार,
जिल्हा कृषी हवामान केंद्र,
कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा.
डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला.