Buldhana: "चित्ता पूनर्वसन प्रकल्प पाच वर्षात यशस्वी होईल, संरक्षण क्षेत्रातही १ लाख करोड रुपयांचे उत्पादन" - भूपेंद्र यादव
By निलेश जोशी | Published: June 9, 2023 08:22 PM2023-06-09T20:22:34+5:302023-06-09T20:23:01+5:30
Buldhana: देशाने यापूर्वी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने टायगर प्रोजेक्टसह अन्य काही प्रोजेक्ट उत्कृष्टपणे यशस्वी केले आहेत. चित्यांचे पूनर्वसन हा प्रकल्पही आगमी पाच वर्षाच यशस्वी होईल, असा विश्वास केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी बुलढाणा येथे व्यक्त केला.
- नीलेश जोशी
बुलढाणा: देशाने यापूर्वी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने टायगर प्रोजेक्टसह अन्य काही प्रोजेक्ट उत्कृष्टपणे यशस्वी केले आहेत. चित्यांचे पूनर्वसन हा प्रकल्पही आगमी पाच वर्षाच यशस्वी होईल, असा विश्वास केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी बुलढाणा येथे व्यक्त केला. सोबतच गेल्या नऊ वर्षात देश आत्मनिर्भर होत असून एकट्या संरक्षण क्षेत्रात १ लाख कोटी रुपयांचे उत्पादन भारत करत आहे. त्यातून रोजगाराच्या मोठ्या संधीही मिळाल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘मोदी ॲट नाईन’ या उपक्रमातंर्गत बुलढाणा जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर ते आले होते. त्यावेळी बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी उपरोक्त बाब स्पष्ट केली. भारतात आफ्रिका खंडातून चिते आणल्यानंतर त्यांचा मृत्यू होत आहे. हा मुद्दा घेऊन त्यांना विचारणा केली असता उपरोक्त वक्तव्य त्यांनी केले. यावेळी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. संजय कुटे, ॲड. आकाश फुंडकर, माजी आ. चैनसुख संचेती, श्वेता महाले, भाजपा नेते योगेंद्र गोडे, लोकसभा निवडणूक प्रमुख विजयराज शिंदे आणि शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यावेळी उपस्थित होते.
गेल्या नऊ वर्षात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तीन मुद्द्यांना धरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्र सरकार काम करत आहे. कोरोना काळात २०० कोटी नागरिकांचे लसिकरण ही एक मोठी उपलब्धी असल्याचे ते म्हणाले. कृषी क्षेत्रासह आर्थिक क्षेत्रातही मोठे काम या नऊ वर्षात झाले असून आज इंग्लन्डपेक्षाही भारताची अर्थव्यवस्था मोठी झाली असल्याचे ते म्हणाले. साडेतीन कोटी नागरिकांना या नऊ वर्षात निवास उपलब्ध करून दिल्याचेही ते म्हणाले. शेवटच्या व्यक्तीला लाभ देण्याचे निर्धारित लक्ष्य गाठतांनाच तेही वेळेत तो लाभ मिळावा यासाठीच ९ वर्ष आम्ही कार्यरत होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र सरकारची पावले योग्य दिशेने
महाराष्ट्रातील फडणवीस-शिंदे यांचे सरकार योग्य दिशेने पावले उचलत असून विकासाचा वेग वाढला आहे. महाराष्ट्रात आज इतिहासाची तरोडमरोड केल्या जात असून त्यातून असामाजिक तत्वांना उभारी देण्याचे काम येथील विरोधी पक्ष व काँग्रेस करत असल्याचा आरोपही यावेळी बोलतांना केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांनी केला.