तिमिरातून तेजाकडे नेण्यासाठी स्पर्धा परीक्षा उत्तम पर्याय - जिल्हाधिकारी पुलकुंडवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 01:48 PM2018-02-10T13:48:07+5:302018-02-10T13:52:29+5:30
बुलडाणा : भविष्याला तिमिरातून तेजाकडे नेण्यासाठी स्पर्धा परीक्षा उत्तम पर्याय आहे. कठोर मेहनत घेवून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशस्वी करिअर करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.
बुलडाणा : कुठल्याही कार्यक्रमाची सुरूवात ही दिपप्रज्वलनाने होत असते. दिप प्रज्वलन म्हणजे तिमिरातून तेजाकडे जाणे. तो कार्यक्रम उपस्थितांना अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जात असतो. असाच हा देखील कार्यक्रम आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी याठिकाणी आहेत. भविष्याला तिमिरातून तेजाकडे नेण्यासाठी स्पर्धा परीक्षा उत्तम पर्याय आहे. कठोर मेहनत घेवून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशस्वी करिअर करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात शुक्रवारला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार बोलत होते. यावेळी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, उपजिल्हाधिकारी प्रमोद देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे, भूमि अभिलेखचे जिल्हा अधिक्षक जधवर आदी उपस्थित होते. केवळ नोकरी मिळावी या हेतूने स्पर्धा परीक्षा न देण्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, नोकरीपेक्षा सेवाभाव ठेवून स्पर्धा परीक्षांमधून प्रशासनात आले पाहिजे. नोकरी म्हटली म्हणजे, संसाराचा गाडा चालविण्यासाठी मिळालेले साधन. मात्र दीन दुबळयांची, गरीबांची सेवा करण्यासाठी नोकरीत आले पाहिजे. हा भाव ठेवून प्रत्येकाने अभ्यास करावा. प्रशासनात बदल होत असून डिजीटलायझेशन प्रशासनात येत आहे. त्याअनुषंगाने माहिती व तंत्रज्ञानाचा अभ्यास करून प्रशासनात यावे. जेणेकरून खुप चांगल्या पद्धतीने काम आपणाला करता येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वराडे, जधवर आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेतील विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होत्या.