सुशोभीकरण गेलं चुलीत!... मुलांना पहिले स्वच्छतागृह द्या; देऊळघाटमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा संताप
By निलेश जोशी | Published: January 30, 2024 07:19 PM2024-01-30T19:19:42+5:302024-01-30T19:20:13+5:30
मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील हे ३० जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथे गेले होते
बुलढाणा : जी ट्वेंटीसह मोठमोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये महत्त्वपूर्ण सहभाग राहिलेले बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी ३० जानेवारी रोजी देऊळघाट ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्याची चांगलीच शाळा घेतली. विद्यार्थ्यांना नीटनेटके स्वच्छतागृहच नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचा पारा चढला आणि त्यांनी ग्रामसेवकाला सभ्य भाषेत परंतु धारधार शब्दांत समज दिली. त्यामुळे सध्या तालुक्यात हा विषय चर्चेचा ठरत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहे.
त्याअनुषंगाने मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील हे ३० जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथे गेले होते. त्यांच्या सोबत बुलढाणा उपविभागीय अधिकारी पुलकित सिंह, तहसीलदार रूपेश खंडारे व अन्य कर्मचारी होते. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद उर्दू व मराठी शाळेतील मतदान केंद्राची पाहणी केली. तसेच स्वच्छतागृहसुद्धा तपासले. तेव्हा त्याची झालेली दयनीय अवस्था पाहून जिल्हाधिकारी अक्षरश: संतापले. मात्र, त्यांनी संयम राखत ग्रामसेवकाला येथील स्वच्छतागृहाची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, ग्रामसेवकाने सुशोभीकरण करायचे आहे, असे सांगत वेगवेगळी कारणे सांगितली. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी ‘सुशोभीकरण गेलं चुलीत, आधी स्वच्छतागृह द्या!!’ अशी समजूत तेथे उपस्थित ग्रामसेवकाला दिली. त्यामुळे उपस्थित ग्रामस्थही आवाक् झाले.
...तर लोक सोडणार नाहीत
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यावेळी म्हणाले की, वित्त आयोगाचा निधी मिळतो. त्यातील ५० टक्के निधीही खर्च करता येतो. कसलं सुशोभीकरण करता. मुलांसाठी स्वच्छतागृह नाही. असंच राहिलं तर नागरिक तुम्हाला सोडणार नाही, असे वक्तव्य केले. स्वच्छतागृहाचे काम करा, असे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, यावेळी ग्रामसेवकाने टॉयलेट बांधायचे असून टिनपत्रेही टाकावयाची असल्याचे सांगत दुसऱ्या ठिकाणी बांधकाम सुरू असल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. मात्र, आधी शालेय मुलांना सुविधा देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.