Buldhana Crime : दरोड्यासह मोठ्या घातपाताचा कट उधळला; सात जणांची टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 12:27 PM2020-11-22T12:27:04+5:302020-11-22T12:30:47+5:30
Buldhana Crime त्यांच्याकडे लोखंडी हत्यारे असल्याची गोपनीय माहिती मेहकर पोलिसांना मिलाली होती.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मेहकर/सुलतानपुर : दरोड्यासह बनावट सोने विक्री प्रकरणातील संदिग्ध असल्याच्या संशयावरून मेहकर पोलिसांनी सुलतानपूर नजीक सात जणांना पकडले असून एक जण फरार होण्यात यशस्वी झाला आहे. दरम्यान, या आरोपीकडून एक चार चाकी वाहनासह १ लाख नऊ हजार रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या टोळीतील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याचीही माहिती समोर येत आहे.
शुक्रवारी दुपारी मेहकर पोलिसांनी ही कारवाई केली. त्यामुळे दरोड्यासह मोठ्या घातपाताचा कट मेहकर पोलिसांनी उधळला असल्याचे समोर येत आहे. मेहकर-सुलतानपूर मार्गावर एका पुलानजीक एक चारचाकी (एमएच-१४-बीसी-९९१) क्रमांकाचे वाहन संशयितरित्या उभे असून त्यांच्याकडे लोखंडी हत्यारे असल्याची गोपनीय माहिती मेहकर पोलिसांना मिलाली होती. अनुषंगीक माहितीची खात्री करण्यासाठी ठाणेदार आत्माराम प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर सानप, पोलिस कॉन्स्टेबल निवृत्ती सानप, गणेश लोढे, राजेश उंबरकर, विजय आंधळे यांनी दोन पंचासह जावून संदिग्ध वाहनाची पाहणी केली असता त्यातील तीन आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून दोन जणांना ताब्यात घेतले तर एक जण फरार झाला. संदिग्दांची विचारपूस केली असता बळीराम पुंडलीक चव्हाण (५५), रविंद्र प्रभू भोसले (२८), राष्ट्तारपाल देवानंदजाधव (२६, सर्व. रा. दधम, ता. खामगाव), आकाश माणिकराव चव्हाण (१८), दिलीप ज्ञानेश्वर चव्हाण (२२, रा. लाखनवाडा), सतिष मोहन पवार (१९, रा. जयरामगड) याच्यासह एका अल्पवयीन मुलाचा यात समावेश आहे. दरम्यान, पळून गेलेल्या व्यक्तीचे नाव गणेश राठोड असून तो खामगाव तालुक्यातीलच लाखनवाडा येथील रहिवासी असल्याचे समजते.
प्रकरणी पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्यात पाच मोबाईल, दोन लोखंडी रॉड, एक लोखंडी पाईप, मिरची पावडर, दोन देसी दारूच्या बाटल्या, पिवळ्या धातुच्या गिन्न्याचे (नकली सोने) एकूण ६३० ग्रॅम वजनाचे ४०५ नग व वाहन असा एक लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर पोलिस करीत आहेत. एखाद्या मोठ्या गुन्ह्याच्या तयारी हे संदिग्ध मेहकर, सुलतानपूर परिसरात फिरत असल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे.