buldhana: अपघातग्रस्त पित्या पाठोपाठ मुलीचा मृत्यू भक्तीसाठी जोडलेल्या हातांना नियतीपुढे निराशा
By संदीप वानखेडे | Published: April 12, 2023 07:05 PM2023-04-12T19:05:59+5:302023-04-12T19:06:30+5:30
Buldhana: बुलढाणा - मेहकर ते हिवरा आश्रम रोडवर नांद्रा धांडे फाट्यावर आयशरने चिरडल्याने गजानन म्हस्के हे १ एप्रिल राेजी जागीच ठार झाले होते, तर सोबत असलेली त्यांची मुलगी भक्ती ही गंभीर जखमी झाली होती.
- संदीप वानखडे
बुलढाणा - मेहकर ते हिवरा आश्रम रोडवर नांद्रा धांडे फाट्यावर आयशरने चिरडल्याने गजानन म्हस्के हे १ एप्रिल राेजी जागीच ठार झाले होते, तर सोबत असलेली त्यांची मुलगी भक्ती ही गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, ११ दिवस मृत्यूशी झुंज दिलेल्या भक्तीची १२ एप्रिल रोजी प्राणज्योत मालवली.
मेहकर तालुक्यातील ब्रह्मपुरी ह. मु. हिवरा आश्रम येथील गजानन पांडुरंग म्हस्के व त्यांची १३ वर्षीय मुलगी भक्तीला नांद्रा धांडे फाट्यानजीक आयशरने धडक दिली असता गजानन पांडुरंग म्हस्के यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर वडिलांच्या पाठीमागे बसून असलेली भक्ती गंभीर जखमी झाली हाेती. तपासणीअंती शस्त्रकियेसाठी मोठा खर्च अपेक्षित होता. म्हस्के कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती जेमतेम व बेताची असल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून भक्तीच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करताच सर्वपक्षीय राजकारणी, शेतकरी, शेतमजूर, शिक्षक, डॉक्टर, पत्रकार, समाजसेवक, ऑटो युनियन, व्यावसायिक तथा समाजातील सर्वच स्तरांतून आपापल्या परीने भक्तीच्या उपचारासाठी खारीचा वाटा देत तिचे प्राण वाचविण्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांनी ईश्वराकडे हात जोडले होते. मात्र त्या जोडलेल्या हातांना नियतीपुढे अपयश आले.
म्हस्के कुटुंबावर आघात
डॉक्टर, नातेवाईक, कुटुंबीयांनी तिचे प्राण वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र भक्तीने दोन-तिन दिवसांपासून उपचाराला प्रतिसाद न दिल्याने बुधवारी तिची प्राणज्योत मालवली. म्हस्के कुटुंबीयावर गजानन म्हस्के आणि भक्तीच्या जाण्याने हा बारा दिवसांत दुसरा आघात झाला.