बुलढाणा जि.प. प्रशासनाच्या दडपशाही विरोधात माटरगाव कडकडीत बंद
By सदानंद सिरसाट | Published: August 5, 2023 04:04 PM2023-08-05T16:04:20+5:302023-08-05T16:04:20+5:30
शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची ८ पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते.
जलंब (बुलढाणा): माटरगाव येथील जि.प शाळेतील रिक्त असलेल्या जागेवर शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याच्या पालकावरच जिल्हा परिषद शासनाने गंभीर गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ शनिवारी ग्रामस्थांनी माटरगाव बंदची हाक दिली. या बंदला माटरगाववासीयांनी उस्फूर्त प्रतिसाद देऊन कडकडीत बंद पाळला, तसेच प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची ८ पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. शिक्षक मिळण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी वारंवार निवेदन दिले. प्रशासनाने या बाबीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे २ ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या आवारात विद्यार्थ्यांनी शाळा भरवली, तसेच शिक्षकाच्या मागणीबाबत मागण्याही मंजूर करण्यात आल्या होत्या. मात्र, सर्व काही प्रक्रिया पार पडल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने पालकांवरच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. त्या निषेधार्थ गावकऱ्यांनी माटरगाव येथे सकाळपासूनच गावातील सर्व हॉटेल, पानपट्टी, कापड दुकाने, भाजीपाला मंडी, विविध शैक्षणिक संस्था बंद होत्या.
यावेळी जिल्हा परिषद च्या प्रशासनाविरोधात नारेबाजी करून निषेध व्यक्त केला. यावेळी जलंब पोस्टेचे ठाणेदार अमोल बारापात्रे यांच्या मार्गदर्शनात पोलिस बंदोबस्त होता.
...पतीने असा काय गुन्हा केला
मुलगी जि.प. शाळेमध्ये इयत्ता १० वी मध्ये शिकत आहे. शिक्षक नसल्यामुळे लोकशाही मार्गाने पती शिक्षकांच्या मागणीसाठी आंदोलनामध्ये गेले होते. पतीवरच जिल्हा प्रशासनाने गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. त्यामुळे पती कोणालाही न सांगता अटकेच्या भीतीने घरून निघून गेले. पतीचे काही बरे-वाईट झाल्यास याला जि.प प्रशासनच जबाबदार राहील. -रूपाली दिनेश तांबटकार
लोकशाही मार्गाने आंदोलन करणे आता गुन्हा
माटरगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये मुलगी १० वी मध्ये शिक्षण घेते. पती शाळा समितीचे अध्यक्ष असून ते न्याय मागण्यासाठी आंदोलनामध्ये सहभागी झाले. मात्र, न्याय मिळवण्याऐवजी जि.प. प्रशासनाने गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. त्यामुळे पतीची या खोट्या गुन्ह्यातून सुटका करावी - अर्चना गणेश सपकाळ
अधिकाऱ्याची बदली करा..
बुलढाणा येथील जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा कार्यकाळ संपला असूनसुद्धा काही लोकप्रतिनिधींनी त्यांचा कार्यकाळ वाढवून त्याना ठेवले आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करूनसुद्धा खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याची तत्काळ बदली करावी. - विजय हिरडकार, माटरगाव