बुलडाणा जिल्ह्यात १८३५ बालके तीव्र कुपोषीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 06:02 PM2019-05-13T18:02:02+5:302019-05-13T18:02:07+5:30
जिल्ह्यात वयोमानानुसार वजन कमी असलेल्या बालकांची समस्या गंभीर असून या तीव्र कुपोषीत बालकांची संख्या १ हजार ८३५ वर पोहचली आहे.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: दुष्काळात निर्माण होणाºया वेगवेळ्या समस्यांमध्ये कुपोषणाची समस्या चिंताजनक बनत चालली आहे. जिल्ह्यात वयोमानानुसार वजन कमी असलेल्या बालकांची समस्या गंभीर असून या तीव्र कुपोषीत बालकांची संख्या १ हजार ८३५ वर पोहचली आहे. त्यामुळे दुष्काळात कुपोषणाची छाया गडद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कुपोषणमुक्तीकडे वाटचाल करण्यासाठी विविध प्रयत्न होत असले तरी, जिल्ह्यात कुपोषण पाय रोऊनच बसले आहे. आता तर दुष्काळाचे संकट जिल्ह्यावर ओढावलेले असताना कुपोषाची समस्याही डोकेवर काढत आहे. जिल्हा परिषद एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ६० हजार ५४९ बालकांचे सर्वेक्षण केले असता वजनाने कमी असलेल्या बालकांची समस्या समोर आली. १ लाख ३५ हजार २०० बालके हे साधारण वजनाचे मिळून आले. तर जिल्ह्यात वयोमानानुसार कमी वजनाच्या कुपोषीत बालकांची संख्या १ हजार ८३५ आहेत. बुलडाणा तालुक्यात १५८, चिखली २१७, मेहकर २१४, लोणार १२६, सिंदखेड राजा १७८, देऊळगाव राजा ७१, मलकापूर ७३, मोताळा ८०, नांदुरा १०८, जळगाव जामोद २०१, संग्रामपूर १५१, शेगाव ११० व खामगाव तालुक्यात १४८ कुपोषीत बालके आहेत. विशेषत: आदिवासी भागांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. दीड हजारावर बालकांचे वजन हे त्यांच्या वयाच्या प्रमाणात अत्यंत कमी असल्याने मुलांचे वजन वाढीसाठी विशेष आहार सुरू करण्याची आवश्यकता आहे.