बुलडाणा : जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्ण ‘रेफर’ करण्याचे प्रमाण वाढले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:36 AM2018-01-31T00:36:52+5:302018-01-31T00:39:11+5:30
बुलडाणा: जिल्हा सामान्य रुग्णालयातून रुग्ण औरंगाबाद रेफर करण्याचे प्रमाण वाढले असून, घाटी रुग्णालयाने या संदर्भात सूचना दिल्या आहेत; मात्र याचा सर्वात जास्त त्रास ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना होत असून, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अखत्यारीतील काही रुग्णवाहिकाही किरकोळ दुरुस्तीच्या कारणावरून अनेक दिवसांपासून उभ्या आहेत. त्यामुळे खासगी रुग्णवाहिकेचा आर्थिक फटका गरीब रुग्णांना बसत आहे.
हर्षनंदन वाघ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्हा सामान्य रुग्णालयातून रुग्ण औरंगाबाद रेफर करण्याचे प्रमाण वाढले असून, घाटी रुग्णालयाने या संदर्भात सूचना दिल्या आहेत; मात्र याचा सर्वात जास्त त्रास ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना होत असून, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अखत्यारीतील काही रुग्णवाहिकाही किरकोळ दुरुस्तीच्या कारणावरून अनेक दिवसांपासून उभ्या आहेत. त्यामुळे खासगी रुग्णवाहिकेचा आर्थिक फटका गरीब रुग्णांना बसत आहे.
मराठवाडा, जळगाव खान्देशच्या सीमा लगत असलेल्या गावांसह जिल्ह्यातील आदिवासी, ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांचे आशास्थान म्हणून बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाहिले जाते. येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा मिळण्याच्या दृष्टिकोनातून शासनातर्फे भरघोस निधी देण्यात आला आहे. सर्वच प्रकारच्या रुग्णांसाठी सर्व सोयीयुक्त इमारतीसह अत्याधुनिक मशीन देण्यात आला आहे.
याशिवाय विविध आजारांवर उपचारासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आले आहेत; मात्र मागील काही वर्षांपासून वैद्यकीय अधिकार्यांची रिक्त पदे, तज्ज्ञ अधिकार्यांच्या कमतरता आदी कारणामुळे अनेक गरीब रुग्णांना उपचार न घेता खासगी किंवा इतर शहरात उपचारासाठी धाव घ्यावी लागते.
बुलडाणा जिल्ह्यात मागील काही दिवसापासून अपघातांची संख्या वाढल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येणार्या रुग्णांची संख्या वाढली आहे; मात्र अनेक अपघातील रुग्णांवर प्राथमिक उपचार करून तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नाहीत आदी कारण पुढे करून रूग्णांना अकोला, औरंगाबाद रेफर करण्यात येत आहेत.
त्यातच जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध रुग्णवाहिकेपैकी अध्र्या रुग्णवाहिका किरकोळ दुरुस्तीअभावी उभ्या आहेत. त्यामुळे रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यास खासगी रुग्णवाहिकेद्वारे रुग्ण रेफर करण्यात येते. यासाठी रुग्णाच्या नातेवाइकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
रेफर केंद्र अकोला; मात्र रुग्णांची मानसिकता औरंगाबाद
जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्णास रेफर करण्यासाठी शासनाने अकोला केंद्र दिले आहे; मात्र सामान्य रुग्णालयात दाखल रुग्णांना रेफर करण्यासाठी नातेवाईक औरंगाबाद केंद्राचा आग्रह धरतात. त्यामुळे रुग्णांना रेफर करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. रुग्णास रेफर करण्यासाठी जीवनदायी योजनेंतर्गत १0८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध असते; मात्र या रुग्णवाहिकेद्वारे रुग्णास अकोला येथे नेण्याची सुविधा दिली आहे; मात्र रुग्णाच्या नातेवाइकांची मानसिकता औरंगाबाद असल्यामुळे रुग्णवाहिका देण्यास नकार देण्यात येतो. तसेच जीवनदायी योजनेचा लाभ न घेणार्या रुग्णास रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाते; मात्र यासाठी येणारा खर्च हा खासगी रुग्णवाहिकेच्या खर्चापेक्षा जास्त असल्यामुळे अनेक रुग्ण खासगी रुग्णवाहिकेचा वापर करताना दिसून येतात.
तीन रुग्णवाहिका धूळ खात उभ्या
जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरात ६ रूग्णवाहिका पैकी ५ रुग्णवाहिका उभ्या आहेत. त्यापैकी तीन रुग्णवाहिका किरकोळ दुरुस्तीअभावी धूळ खात उभ्या आहेत. त्यात एमएच ३0 एच ५१४७, एमएच २८ एच ५0२२ व एमएच २८ एच ५0६३ या क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचा समावेश आहे, तर सुरू असलेल्या तीन रुग्णवाहिकेपैकी एक रुग्णवाहिका किरकोळ दुरुस्तीसाठी सोमवारी अकोला येथे पाठविण्यात आली होती. उभ्या दोन रुग्णवाहिकेपैकी एक रुग्णवाहिका अत्यावश्यक सेवा असलेल्या १0८ क्रमांकाच्या कॉलसाठी होती. तर इतर एक रुग्णवाहिका ग्रामीण भागातील गरोदर महिला इतर सेवेसाठी असलेल्या १0२ क्रमांकाच्या कॉलसाठी ठेवण्यात आली होती. अशा परिस्थितीमुळे अपघातातील रुग्ण आल्यास त्याला इतर ठिकाणी रेफर करण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नसल्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांना त्रास सहन करावा लागत आहे.
रेफर रुग्णांसाठी रुग्णवाहिकेची सुविधा नियमित दिली जाते; मात्र रेफर केंद्र अकोला असताना रुग्णांच्या नातेवाइकांचा आग्रह औरंगाबाद असल्यास रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी मानसिकता बदलून रुग्णवाहिकेचा लाभ घ्यावा.
-डॉ. भागवन भुसारी, निवासी वैद्यकीय अधिकारी,
जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलडाणा.