बुलडाणा जिल्ह्यात एक लाख २१ हजार मेट्रीक टन चाऱ्याची टंचाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 05:59 PM2018-12-11T17:59:50+5:302018-12-11T18:00:48+5:30
- नीलेश जोशी बुलडाणा : जिल्ह्यातील दहा लाख २० हजार पशुधनाला आगामी सात महिन्यासाठी आठ लाख तीन हजार मेट्रीक ...
- नीलेश जोशी
बुलडाणा: जिल्ह्यातील दहा लाख २० हजार पशुधनाला आगामी सात महिन्यासाठी आठ लाख तीन हजार मेट्रीक टन चाऱ्याची गरज असून जिल्ह्यात प्रत्यक्षात सहा लाख ८१ हजार मेट्रीक टन चाऱ्याची उपलब्धता पाहता एक लाख २१ हजार मेट्रीक टन चार्याची तूट असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे प्रसंगी चाऱ्यासंदर्भात आपतकालीन स्थिती उद्भवल्यास अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यातून चारा उपलब्ध करण्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर नियोजन सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान, सोमवारी मुख्यमंत्र्यांनी टंचाईसंदर्भात व्हीसीमध्ये घेतलेल्या आढाव्यात चाराटंचाईचाही मुद्दा प्रकर्षाने समोर आला होता. त्यानंतर अनुषंगीक उपाययोजनाच्या संदर्भाने यंत्रणांनी हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत माहिती घेतली असता उपरोक्त बाब स्पष्ट झाली. जिल्ह्यात छोट्या गुरांची संख्या ६१ हजार २५७ असून मोठ्या गुरांची संख्या पाच लाख ६७ हजार ७३३ आहे. बकर्यांची संख्या दोन लाख ८४ हजार १७ तर मेंढ्यांची संख्या एक लाख सात हजार ३० असून एकूण पशुधन दहा लाख २० हजार ३७ ऐवढे आहे. या गुरांना प्रतिदिन तीन हजार ८२४ मेट्रीक टन चार्याची गरज असून दर महा एक लाख १४ हजार ७४३ मेट्रीक टन चारा लागतो. ही स्थिती पाहता आगामी सात महिन्यासाठी जिल्ह्याला आठ लाख तीन हजार २०७ मेट्रीक टन चार्याची अवश्यकता आहे. जिल्ह्यात चारा उपलब्धतेसाठी गाळपेरा, राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि काही शेतकर्यांकडे उपलब्ध असलेल्या चार्याचा पर्याय प्रशासनाने ठेवला आहे. मात्र त्या उपरही जिल्ह्यात एक लाख २१ हजार मेट्रीक टन चार्याची तूट येत्या काळात निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाळ पेरा करून चार्याची तुट भरून काढण्यासाठी प्रयत्न केल्या जात आहे. त्यासंदर्भाने सध्या कृषी, पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, आत्मातंर्गत प्रययत्न केल्या जात आहेत. सोबतच बहुवार्षिक चारा पीके घेण्यासाठीही शेतकर्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. सिंदखेड राजा, देऊळगाव राजा तालुक्यात ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे, अशा भागात त्यादृष्टीने प्रयत्न होत असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. जी. बोरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
तुर्तास टंचाई नाही
जिल्ह्यात तुर्तास चार्याची टंचाई नाही. मात्र संभाव्य आपतकालीन स्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने मात्र नियोजन केले आहे. त्यानुषंगाने आगामी सात महिन्यासाठी जिल्ह्यात गुरांना चारा पुरेल अशी स्थिती असली तरी चार्याची एक लाख २१ हजार मेट्रीक टनाची तूट पाहता प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. सोमवारी झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या व्हीसीमध्येही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यानुषंगाने नियोजन सुरू असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पी. जी. बोरकर यांनी स्पष्ट केले. चारा कमी पडत असल्यास वनामध्ये काही ठिकाणी फ्री पास देण्याचे प्रयोजन असून संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांचाही त्यासाठी आधार घेण्यात येणार आहे. चार्याची संभाव्य तूट पाहता यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यातून शेवटच्याक्षणी प्रत्येकी ५० हजार मेट्रीक टन चारा उपलब्ध करण्याचे प्रशासनाचे नियोजन असल्याचेही स्पष्ट होत आहे. चारा छावणी तथा चारा डेपो निर्माणाची तुर्तास गरज भासली नसल्याचेही सुत्रांनी स्पष्ट केले.
शेळ््या मेंढ्याला प्रतीदिन ६०० ग्रॅम चारा
जिल्ह्यात जवळपास तीन लाखांच्या घरात शेळ््या मेंढ्यांची संख्या आहे. प्रती शेळी किमान ६०० ग्रॅम चार्याची गरज प्रती दिन लागले. त्यानुषंगाने विचार करता शेळ््यांसाठी पाच हजार ११२ मेट्रीक टन तर मेंढ्यांसाठी एक हजार ९२६ मेट्रीक टन चार्याची गरज भासते. छोट्या गुरांना प्रतीदिन तीन तर मोठ्या गुरांना प्रती दिन सहा किलो चारा आवश्यक असतो. याचा विचार करून आगामी सात महिन्यात जिल्ह्यात किती चारा लागणार आहे, याचे नियोजन सध्या जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाने केले आहे.
जिल्ह्यातील संभाव्य चाराटंचाईच्या निवारणासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू असून प्रसंगी आपतकालीन स्थिती उद्भवल्यास लगतच्या जिल्ह्यातून चारा उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
- डॉ. पी. जी. बोरकर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, बुलडाणा.