बुलडाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गाची मोजणी निम्यावर !
By admin | Published: March 5, 2017 02:05 AM2017-03-05T02:05:04+5:302017-03-05T02:05:04+5:30
जिल्ह्यात ८७.२९0 किमीची व्याप्ती; ४५ किमी मोजणी पूर्ण
ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा, दि. 0४- नागपूर-मुंबई हा समृद्धी महामार्ग बुलडाणा जिल्ह्यातून ८७.२९0 कि.मी.अंतराचा जात आहे. त्यासाठी सयुंक्त मोजणीची प्रक्रिया सुरू असून, जिल्ह्यातील अंतर मोजणी ५२.४६ टक्क्यावर आली आहे. बहुतांश ठिकाणी मोजणी आडवल्या जात असल्याने ४१.४९0 कि.मी.ची मोजणी अद्याप बाकी आहे.
राज्य शासनाची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर, लोणार, सिंदखेड राजा व देऊळगाव राजा या तीन तालुक्यातून जात आहे. या समृद्धी महामार्गासाठी आवश्यक असणार्या जमीन मोजणीचे काम सध्या सुरू आहे. हा समृद्धी महामार्ग नागरिकांच्या सोयीसाठी असल्याने या कामात अडथळे येऊ नयेत, यासाठी या प्रकल्पामध्ये जमीनी जात असलेल्या शेतकर्यांना या प्रकल्पाची स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी झाडे यांच्यामार्फत सभा घेऊन माहिती देण्यात आली आहे.
स्थानिक लोक अडचणी घेऊन आल्यास त्या तक्रारींचे योग्य निरसन करता यावे, याकरिता जिल्हास्तरावर समृद्धी महामार्गाचे कार्यालयही देण्यात आले आहे. सुरूवातीला ड्रोनच्या साहाय्याने समृद्धी महामार्ग जात असल्येल्या अंतराचे सर्वेक्षण करण्यात आले.
आता संयुक्त मोजणी करण्याची प्रक्रिया सुरू असून, जवळपास ५२.४६ टक्के मोजणी पूर्ण झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गाचे ८७.२९0 किमी अंतर असून, यातील आजपर्यंत एकूण ४५.८00 कि.मी.अंतराची संयुक्त मोजणी झाली आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे मेहकर तालुक्यात एकूण अंतर ३६.१ कि.मी. असून, त्यापैकी २३.९00 कि.मी.ची मोजणी पूर्ण झाली आहे. लोणार तालुक्यातील एकूण अंतर १३.३९२ कि.मी. असून, त्यापैकी ९.२00 कि.मी.ची मोजणी पूर्ण झाली आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील एकूण अंतर २६.८९८ कि.मी. व त्यापैकी १२.७00 कि.मी.ची मोजणी पूर्ण झाली आहे. देऊळगाव राजा तालुक्यात एकूण अंतर १0.९00 कि.मी. आहे; मात्र येथे अद्याप मोजणीला सुरूवात करण्यात आली नाही.
१0 मार्चपर्यंत करावी लागणार मोजणी पूर्ण
नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गासाठी सयुंक्त मोजणीची प्रक्रिया १0 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र अद्याप ४५.८00 कि.मी.च मोजणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे सहा दिवसात ४१.४९0 कि.मी. अंतराची संयुक्त मोजणी करणे प्रशासनासमोर मोठे आवाहन आहे.
संयुक्त मोजणीनंतर होणार चित्र स्पष्ट!
सध्या सुरू असलेली संयुक्त मोजणीची प्रक्रिया म्हणजे जमीनीचा ताबा घेणे नव्हे तर, कोणाची जमीन किती या महामार्गात आंतभरूत होणार याचे निश्चितीकरण आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गामध्ये कोणत्या शेतकर्याची किती जमीन जाते हे सयुंक्त मोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. तसेच जमीनीव्यतिरिक्त फळबागा, विहिरी, घरे, जनावरांसाठी बनविलेले गोठे, झाडे किती जातात याची संपुर्ण यादी ही संयुक्त मोजणी प्रक्रियेनंतर समोर येणार आहे. त्यामुळे संयुक्त मोजणीनंतरच प्रत्यक्ष लॅण्ड पुलिंगच्या कामाल सुरूवात होईल.