विभागात बुलडाणा जिल्हा दुसरा; जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८९.१६ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 06:41 PM2018-06-08T18:41:02+5:302018-06-08T18:41:02+5:30
बुलडाणा : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा बुलडाणा जिल्ह्याचा निकाल यंदा घसरला असून गेल्या वर्षी विभागात प्रथम असलेला जिल्हा यंदा मात्र दुसर्या स्थानी फेकल्या गेला आहे.
बुलडाणा : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा बुलडाणा जिल्ह्याचा निकाल यंदा घसरला असून गेल्या वर्षी विभागात प्रथम असलेला जिल्हा यंदा मात्र दुसर्या स्थानी फेकल्या गेला आहे. जिल्ह्याचा सरासरी निकाल ८९.१६ टक्के लागला आहे. गेल्या वर्षी बुलडाणा जिल्हा अमरावती विभागात प्रथम क्रमांकावर होता. यंदा वाशिमने बाजी मारत बुलडाण्याला दुसर्या स्थानावर टाकले आहे. दरम्यान, गेल्यावर्षी प्रमाणे या वर्षीही सिंदखेड राजा तालुक्याने जिल्ह्यातून निकालाच्या बाबतीत प्रथम क्रमांक पटकावला असून तालुक्याचा सरासरी निकाल ९४.९७ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील ५०७ शाळांतील ३९ हजार ९१७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. पैकी प्रत्यक्षात ३९ हजार ७२९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३५ हजार ४२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी ही ८९.१६ टक्के आहे. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८७.४१ टक्के तर मुलींचे हे प्रमाण ९१.३७ टक्के आहे. परीक्षा दिलेल्या २२ हजार १९५ मुलांपैकी १९ हजार ४०१ मुले उत्तीर्ण झाली. १७ हजार ५३४ मुलींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १६ हजार २० मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. दरम्यान, सिंदखेड राजा तालुक्याचा निकाल जिल्ह्यात सर्वाधिक असून तची टक्केवारी ही ९४.९७ टक्के आहे. त्या खालोखाल चिखली तालुक्याचा ९३.४३ टक्के तर बुलडाणा तालुक्याचा निकाल ९२.७८ टक्के लागलाा आहे. मोताळा तालुक्याचा निकाल ९०.७६ टक्के लागला आहे तर देऊळगाव राजा तालुक्याचा निकाल ९०.१६ टक्के लागला आहे. नांदुरा तालुक्याचा निकाल जिल्ह्यात सर्वात कमी लागला असून तो ८१.४४ टक्के आहे. गेल्यावर्षी शेगाव तालुक्याचा निकाल सर्वात कमी होता. मात्र यावर्षी या तालुक्याने सुधारणा करीत तळातून तिसरा क्रमांक पटकावला आहे. उत्तीर्णांची टक्केवारी सर्वाधिक असलेल्या सिंदखेड राजा तालुक्यातील एक हजार १६६ मुले आणि ८७८ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. गेल्या वर्षीही मातृतिर्थ सिंदखेड राजा तालुक्याने जिल्ह्यात निकालाच्या बाबतीत अव्वल स्थान मिळवले आहे. यंदाही ही परंपरा सिंदखेड राजा तालुक्याने ही परंपरा जपली आहे. रिपीटरमध्ये चौथा अमरावती विभागात रिपीटरमध्येही गेल्या वर्षी विभागात प्रथम असलेला बुलडाणा जिल्हा यंदा मात्र विभागात चौथ्यास्थानावर फेकल्या गेला आहे. यंदा जिल्ह्यातील रिपीटर म्हणून दोन हजार ३६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी प्रत्यक्षात दोन हजार २४ मुलांनी परीक्षा दिली. त्यातील ९२५ मुले उत्तीर्ण झाली आहेत. त्यामुळे रिपीटर मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ही ४५.७० ऐवढी आहे. मात्र परीक्षेस बसलेल्या मुलींपैकी ५०.८५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ४४.१४ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. (प्रतिनिधी)