बुलडाणा जिल्हय़ात वासुदेव करतोय ‘लेक वाचवा, लेक शिकवा’चा जागर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:26 AM2017-12-13T01:26:07+5:302017-12-13T01:30:44+5:30
बुलडाणा: गर्भलिंग निदान करण्याची प्रथा पाहता ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियानाचा जागर बुलडाणा जिल्हय़ात सध्या सुरू आहे. दरम्यान, जुन्या गाव परंपरेतील नामशेष होऊ पाहणार्या वासुदेवाच्या माध्यमातूनही आता यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गर्भलिंग निदान करण्याची प्रथा पाहता ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियानाचा जागर बुलडाणा जिल्हय़ात सध्या सुरू आहे. दरम्यान, जुन्या गाव परंपरेतील नामशेष होऊ पाहणार्या वासुदेवाच्या माध्यमातूनही आता यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. त्यामुळे वासुदेवाचे गावातील स्थान आणि लेक वाचवाचा संदेश दोन्ही साध्य करण्याचा उद्देश या माध्यमातून पूर्णत्वास नेला जात आहे.
मुलींचा जन्मदर वाढविण्याच्या उद्देशाने शासनस्तरावरून बेटी बचाओ अभियान हाती घेण्यात आले. त्यासाठी शाळा, सामाजिक संस्था, शासकीय अधिकारी व कर्मचार्यांची मदत घेतली जात आहे. महिला व बालकल्याण आरोग्य विभाग जि.प. बुलडाणा अंतर्गत बुलडाणा जिल्हास्तरावर ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ या संदर्भात लोककलेच्या माध्यमातून कलापथकांच्या पुढाकाराने संपूर्ण जिल्ह्यामध्ये जनजागृती चालू आहे. लोककलेतून जनजागृतीसाठी काही कलापथक मंडळाची निवड चाचणी जिल्हा परिषदमध्ये घेण्यात आली. यामध्ये महिला बालकल्याण सभापती श्वेता महाले, महिला बाल कल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी मेसरे, खरे, पाटील व जि.प. कर्मचारी यांच्यासमोर ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ यासंदर्भात काही कलासंचांनी आपली कला सादर केली. त्यानंतर या चाचणीमध्ये लोककलावंत गणेश कदम दुधा या कलासंचाची निवड करण्यात आली. लोककलेतून ‘मुलीला वाचवा, मुलीला शिकवा’, माता बाल संगोपन, मुलीचे महत्त्व, मुलींचा जन्मदर कमी होण्याचे कारण शाहीर गणेश कदम यांनी लोककलेतून पटवून दिले. मेहकर तालुक्यात सुलतानपूर आणि बिबी सिंदखेडराजा तालुक्यात शेंदुर्जन व साखरखेर्डा या गावामध्ये त्यांनी त्यांच्या संचासहित कलापथकांच्या माध्यमातून विशेष म्हणजे वासुदेवांच्या माध्यमातून ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ हे महत्त्व पटवून सांगितले. सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी या कलापथकाकडून वासुदेवाच्या माध्यमातून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ची जनजागृती करण्यात येत आहे.
गावोगावी मिळतोय प्रतिसाद
गावोगावी जनजागृती करण्यात येत असलेल्या या लोककला पथकाच्या संचामध्ये शाहीर गजानन जाधव, दगडू जाधव, सुभाष सुरडकर, मल्हारी मुळे, शिवाजी गायकवाड, मंगेश कदम, शाहीर गणेश कदम या कलावंतांनी भाग घेतला आहे. सदर कार्यक्रमाला गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, गावातील महिला, पुरुष युवा मंडळी या सर्वांचा प्रतिसाद मिळत आहे.